कच्चे धागे, जहरीला इंसान, स्वर्ग नरक, फूलखिले हैं गुलशन गुलशन, मांग भरो सजना, दासी,अंगूर, घर एक मंदिर अशा एकापेक्षा एक गाजलेल्या चित्रपटात आपल्या अदाकारीने रिझवणा-या अभिनेत्री म्हणजे, मौसमी चॅटर्जी. आज (२६ एप्रिल) मौसमी यांचा वाढदिवस. २६ एप्रिल १९४८रोजी जन्मलेल्या या सदाबहार अभिनेत्रीबद्दल जाणून घेऊ या काही रोचक गोष्टी...
मौसमी चॅटर्जी या नावाने सिनेसृष्टीत लोकप्रिय झालेल्या मौसमीचे खरे नाव फार कमी लोकांना ठाऊक असेल. होय, मौसमी यांचे खरे नाव इंदिरा असे आहे. दिग्दर्शक तरूण मजूमदार यांनी त्यांचे मौसमी असे नामकरण केले.
मौसमी ‘बालिका वधू’नंतर अचानक प्रसिद्धीच्या झोतात आल्या. दोनच वर्षांत हिंदी चित्रपटांतही त्यांनी आपली ओळख निर्माण केली. यशाच्या शिखरावर असताना मौसमी लग्नाचा निर्णय घेतील, असे कुणालाही वाटले नव्हते. पण मौसमी यांनी लग्न केले आणि वयाच्या १८ व्या वर्षी पहिल्या अपत्याला जन्मही दिला. प्रसिद्ध गायक हेमंत कुमार यांचा मुलगा जयंतबरोबर मौसमी यांचे लग्न झाले. मौसमी यांना दोन मुली आहेत. मेधा आणि पायल ही त्यांची नावे आहेत.
लग्नानंतर अभिनेत्रींचे करिअर संपुष्टात येते, या मान्यतेला मौसमी यांनी छेद दिला. लग्नानंतर काही वर्षांचा ब्रेक घेत, मौसमी यांनी चित्रपटांत पुन्हा एकदा धमाकेदार वापसी केली. आवाज, घायल, ना तुम जानो ना हम, आ अब लौट चले या चित्रपटांनी मौसमी यांना मोठे यश मिळवून दिले. मौसमी आणि विनोद मेहरा यांच्या जोडीला प्रेक्षकांनी विशेष पसंत केले. याशिवाय जितेंद्र, संजीव कुमार, राजेश खन्ना, शशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबतही मौसमी यांनी काम केले.