नेहा कक्करचा आज म्हणजेच 6 जूनला वाढदिवस असून तिने तिच्या करियरची सुरुवात इंडियन आयडलमधून केली आहे. या कार्यक्रमात ती एक स्पर्धक म्हणून झळकली होती. पण गेल्या काही वर्षांत तिने स्पर्धक ते परीक्षक असा प्रवास केला आहे. आज बॉलिवूडमधील आघाडीच्या गायिकांमध्ये तिची गणना केली जाते. तिने एकाहून एक हिट गाणी गेल्या काही वर्षांत गायली आहेत.
दिल्लीतील एका पंजाबी कुटुंबात ६ जून १९८८ ला नेहाचा जन्म झाला. नेहा प्रमाणेच तिची बहीण सोनू देखील गायक असून त्या दोघी सुरुवातीला देवीच्या जागरणामध्ये भजनं गायच्या. यासाठी तिला केवळ ५०० रुपये मिळायचे. पण आज तिने तिच्या मेहनतीने बॉलिवूडमध्ये आपले एक स्थान निर्माण केले असून आँख मारे, माही वे, मिले हो तुम, बदरी की दुल्हनियाँ, मैं तेरा बॉयफ्रेंड, काला चष्मा ही तिची अनेक गाणी प्रचंड गाजली आहेत. इंडियन आयडलची एक स्पर्धक ते परीक्षक हा तिचा प्रवास थक्क करणारा आहे. ज्या कार्यक्रमाने आपल्याला एक ओळख मिळवून दिली, त्याच कार्यक्रमात इतकी महत्त्वाची भूमिका बजावायला नेहाला मिळाली.
नेहा कक्करने आपल्या करिअरची सुरुवात इंडियन आयडल या रिऑलिटी शोद्वारे केली. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सिझनमध्ये ती एक स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. त्यावेळी ती केवळ अकरावीत शिकत होती. या कार्यक्रमाचे तिला विजेतेपद मिळवता आले नसले तरी या कार्यक्रमामुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. बॉलिवूडमध्ये एक गायिका म्हणून आपले प्रस्थ निर्माण केल्यानंतर सारेगमपा या रिअॅलिटी शोमध्ये ती परीक्षकाच्या भूमिकेत दिसली आणि त्यानंतर तिने इंडियन आयडलमध्ये परीक्षकाची भूमिका बजावली. एका मुलाखतीत नेहाने सांगितले होते की, मी एका रिअॅलिटी शोद्वारे माझ्या कारकिर्दीची सुरुवात केल्याने माझ्यासाठी रिअॅलिटी शो हे खूप जवळचे आहेत. मला कोणत्या तरी रिअॅलिटी शोमध्ये परीक्षकाची भूमिका साकारायला मिळावी अशी माझी नेहमीच इच्छा होती.
नेहा कक्कर गेल्यावर्षी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आली होती. अभिनेता हिमांश कोहलीसोबत तिचे अनेक वर्षं अफेअर होते. ते एकमेकांसोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर नेहमीच पोस्ट करायचे. पण काही महिन्यांपूर्वी त्यांनी ब्रेकअप केले. या ब्रेकअपनंतर ती डिप्रेशनमध्ये देखील गेली होती. पण ती आता या दुःखातून बाहेर आली असून तिच्या करियरकडे लक्ष केंद्रित करत आहे.