अभिनेत्री नुसरत भरूचा आज हे नाव बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत आहे. पण यासाठी नुसरतला अपार संघर्ष करावा लागला. अनेक वर्षे संघर्ष केल्यानंतर ती इथपर्यंत पोहोचली. आज नुसरतचा वाढदिवस.17 मे 1985 साली मुंबईत नुसरतचा जन्म झाला. नुसरतचे वडील एक बिझनेसमॅन आहेत. पण नुसरतला मात्र सुरुवातीपासूनच अॅक्टर बनायचे होते.
तिला पहिली संधी दिली ती छोट्या पडद्याने. होय, ‘किटी पार्टी’ या टीव्ही सीरिअलमध्ये तिला संधी मिळाली. 2002 मध्ये आलेल्या या मालिकेत बॉलिवूड अभिनेत्री पूनम ढिल्लो मुख्य भूमिकेत होती. या मालिकेतून नुसरतने छोट्या पडद्यावर एन्ट्री तर घेतली. पण वर्षभरातच ही मालिका सोडण्याचा निर्णय तिने घेतला. कारण मोठा पडदा तिला खुणावत होता. हातची मालिका सोडून नुसरत चित्रपट मिळवण्यासाठी धडपडू लागली. अनेक मेकर्सची उंबरठे झिजवल्यानंतर 2006 मध्ये अखेर तिचे नशीब फळफळले.
मात्र यानंतर तिला एका पाठोपाठ दोन सिनेमे मिळालेत आणि या सिनेमाने नुसरतचे दिवस पालटले़. ‘लव्ह सेक्स धोखा’ आणि ‘प्यार का पंचनामा’ हे दोन सिनेमे नुसरतच्या करिअरला कलाटणी देणारे ठरले. 2011 मध्ये रिलीज ‘प्यार का पंचनामा’ फार मोठा हिट नव्हता. पण या चित्रपटातील कार्तिक आर्यन व नुसरतची जोडी प्रेक्षकांना चांगलीच भावली. या चित्रपटानंतर नुसरतला ओळख मिळाली. त्याआधी अनेक दिवस नुसरत डिप्रेशनमध्ये होती.
‘प्यार का पंचनामा’ रिलीज होण्याआधी असे काही घडले की नुसरत डिप्रेशनमध्ये गेली होती. त्याआधी रिलीज झालेल्या ‘आकाशवाणी’ या सिनेमासाठी तिने खूप मेहनत घेतली होती. पण हा सिनेमा फ्लॉप झाला. नुसरत दिल्लीला परत आल्यावर तिचे फ्रेंड्स तिला हा सिनेमा पाहायला गेले होते. सर्वांसोबत नुसरत सिनेमा पाहायला गेली तेव्हा थिएटरमध्ये जास्त लोक नव्हते. दिल्लीतल्या एकाच थिएटरमध्ये हा सिनेमा लागला होता आणि थिएटरमध्ये नुसरतला कोणीच ओळखले नाही. तिच्या मागे काही मुलं बसली होती. जे तिच्या प्रत्येक सीनची खिल्ली उडवत होते. हे सर्व सिनेमा संपेपर्यंत सुरू राहिले ज्यामुळे नुसरत खूप दु:खी झाली. यामुळे अनेक दिवस ती डिप्रेशनमध्ये होती.
2015 हे वर्ष मात्र नुसरतसाठी खास ठरले. होय, ‘प्यार का पंचनामा 2’ हा तिचा सिनेमा हिट झाला. यानंतर तीन वर्षांनी 2018 मध्ये तर नुसरतची जणू लॉटरी लागली. होय, या वर्षात आलेला ‘सोनू के टीटू की स्वीटी’ हा तिचा सिनेमा सुपरडुपर हिट झाला. यातही तिच्यासोबत कार्तिक आर्यन होता. हा सिनेमा हिट झाला. केवळ हिट नाही तर या सिनेमाने 100 कोटींचा बिझनेस केला. याचसोबत नुसरत ‘100 कोटी क्लब’ची मेंबर झाली. यानंतर नुसरतने कधीच मागे वळून पाहिलं नाही. आज तिची गणना बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्रींमध्ये होते.