अभिनेत्री राधिका आपटे हिने बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. राधिकाचा आज ३४ वा वाढदिवस असून लवकरच ती द वेडिंग गेस्ट चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता देव पटेल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या राधिका या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे.
राधिकाचा जन्म ७ सप्टेंबर, १९८५ साली तमिळनाडूमधील वेल्लोर येथे झाला होता. त्यानंतर ते पुण्यात स्थायिक झाले. राधिकाचे वडील डॉ. चारूदत्त आपटे पुण्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन आहेत. सुरुवातीचे शिक्षण तिने पुण्यात घेतले नंतर फर्ग्युसन महाविद्यालयातुन तिने अर्थशास्त्र तसेच गणित विषयात पदवी घेतली. राधिकाने हिंदी चित्रपटाशिवाय मल्याळम, बंगाली, मराठी व तमीळ चित्रपटात काम केलं आहे. राधिका प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत व्यक्त करत असते. त्यामुळे बऱ्याचदा ट्रोलही होते.
असं सांगितलं जातं ती राधिका व बेनेडिक्ट यांची भेट २०११ साली झाली होती जेव्हा राधिका कंटेम्परेरी डान्स शिकण्यासाठी लंडनला गेली होती. एक वर्षे डेट केल्यानंतर या दोघांनी २०१२ साली लग्न केलं आणि २०१३मध्ये अधिकृतपणे जाहीर केलं होतं.
राधिका म्हणाली, जेव्हा टेलरने मला डेट करायला सुरूवात केली होती. त्यावेळी त्याने आपली नोकरी सोडून भारतात येण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आम्हा दोघांना हे योग्य वाटले नाही. आम्ही दोघे आमच्या करियरकडे गांभीर्याने पाहतो. त्यामुळे काम सोडून आम्ही दोघेही खूश राहू शकत नाही. त्यामुळे आम्ही दोघेही कामांना प्राधान्य देतो व एकमेकांना नेहमी प्रोत्साहन देतो.
द वेडिंग गेस्ट चित्रपटाशिवाय राधिका लवकरच नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत रात अकेली है चित्रपटात झळकणार आहे.