साऊथ फिल्म इंडस्ट्रीत देवासारखा पुजला जाणारा अभिनेता रजनीकांत यांचा आज (१२ डिसेंबर) वाढदिवस. रजनीकांत यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड आहे. १२ डिसेंबर १९५० रोजी बेंगळुरुतील एका मराठी कुटुंबात जन्मलेल्या रजनीकांत यांचा प्रवास अद्भूत आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांच्याइतकी लोकप्रियता कुणालाच मिळवता आली नाही. आजही रजनीकांत यांचा चित्रपट प्रदर्शित झाला की, चाहते पहाटे पासून चित्रपटगृहांबाहेर रांगा लावतात. रजनीकांत यांच्या चित्रपटाच्या स्वागतासाठी वाजत गाजत मिरवणुका निघतात.आज आम्ही रजनीकांत यांच्याबद्दल नाही तर त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. रजनीकांत व लता रंगाचारी यांच्या लग्नाला ३७ वर्षे झाली आहेत. पण आजही त्यांचे प्रेम तितकेच नवे आहे, जसे ३७ वर्षांपूर्वी होते. १९८० मध्ये रजनीकांत लता यांना पहिल्यांदा भेटले आणि पहिल्याच भेटीत त्यांना प्रेम झाले.
तर गोष्ट आहे, १९८० सालची. रजनीकांत आपल्या ‘थिल्लू मल्लू’ या चित्रपटाचे शूटींग करत होते. १९७९ मध्ये आलेल्या ‘गोलमाल’ या हिंदी चित्रपटाचा रिमेक असलेला ‘थिल्लू मल्लू’ हा रजनीकांत यांचा पहिला कॉमेडी चित्रपट होता. या चित्रपटाच्या शूटदरम्यान रजनीकांत यांना मुलाखतीसाठी विचारणा झाली. चेन्नईतील वुमन कॉलेजच्या एका मॅगझिनसाठी ही मुलाखत होणार होती. कॉलेजची लता रंगाचारी ही मुलगी ही मुलाखत घेऊ इच्छित होती. रजनीकांत या मुलाखतीसाठी तयार झाले आणि लता मुलाखतीसाठी पोहोचली. या मुलाखतीदरम्यान रजनीकांत यांनी लता यांना पहिल्यांदा पाहिले आणि या पहिल्या भेटीतचं ते लता यांच्या प्रेमात पडले. मुलाखतीदरम्यान रजनीकांत व लता दोघेही कमालीचे कम्फर्टेबल होते. याचे कारण म्हणजे दोघांचे बेंगळुरू कनेक्शन. चित्रपटांत येण्यापूर्वी रजनीकांत यांनी बेंगळुरू येथे बस कंडक्टरची नोकरी केली होती आणि लता यांचे घर बेंगळुरूात होते. या पहिल्या भेटीतचं लता हीच आपली ‘सोलमेट’ असल्याचे रजनीकांत यांना जाणवले.
मुलाखत संपली आणि मुलाखत संपताच रजनीकांत यांनी लता यांना लग्नासाठी प्रपोज केले. लता यांच्यासाठी हा सुखद धक्का होता. लग्नासाठी तुम्हाला माझ्या आईवडिलांशी बोलावे लागेल, असे त्या म्हणाल्या. पण रजनीकांत यांनी त्याआधी एकमेकांना पुरेसा वेळ देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर २६ फेब्रुवारी १९८१ रोजी आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे त्यांनी लग्न केले. पुढे दोघांनाही सौंदर्या आणि ऐश्वर्या अशा दोन मुली झाल्यात.
लता ८० च्या दशकामध्ये गायिका म्हणून हिंदी सिनेमांशी जोडलेल्या होत्या. त्या गायिकेसोबतच निर्मात्यासुद्धा आहे. याशिवाय त्या ‘द आश्रम’ या शाळेच्या संचालिका आहेत. या दाम्पत्याला दोन मुली आहेत.