बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) आज आपल्यात नाही. वयाच्या 54 व्या वर्षी जगाला अलविदा म्हणणा-या श्रीदेवींचा आज वाढदिवस. 13 ऑगस्ट 1963 रोजी तामिळनाडूच्या शिवकाशी येथे त्यांचा जन्म झाला होता. 1975 मध्ये प्रदर्शित झालेला‘जुली’ हा त्यांचा पहिला चित्रपट . या चित्रपटात त्या बालकलाकाराच्या रुपात झळकल्या होत्या. (Sridevi Birth Anniversary )
1983 साली आलेल्या ‘हिम्मतवाला’ या चित्रपटाने त्या एका रात्रीतून स्टार झाल्या आणि यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. पण प्रेक्षकांना खळखळून हसवणारी ही अभिनेत्री गतवर्षी 26 फेबु्रवारीला सगळ्यांना रडवून आपल्यातून कायमची गेली. पण तिला विसरणे शक्य नाही. विशेषत: बोनी कपूर यांच्यासाठी तर याजन्मी ते शक्य नाही.
बोनी कपूर आणि श्रीदेवी यांच्यात खास बॉन्डिंग होते. पण अनेकदा श्रीदेवी बोनी कपूर यांच्यावर नाराज होत. होय, बोनी कपूर जेव्हा केव्हा श्रीदेवींना त्यांच्या वयाची आठवण करून देत, श्रीदेवी नाराज होत. केवळ बोनी कपूर एकटेच नाहीत तर वयाची जाणीव करून देणा-या प्रत्येकाचा त्यांना संताप यायचा. वयाचा साधा उल्लेखही त्यांना खपायचा नाही. खुद्द श्रीदेवींनी एका मुलाखतीत हे सांगितले होते. ‘मी 50 वर्षांपासून काम करतेय आणि चित्रपटसृष्टीत सीनिअर आहे, असे लोक म्हणतात, तेव्हा मला राग येतो. त्यांचे हे शब्द मला अप्रत्यक्षपणे माझ्या वयाची आठवण करून देतात,’ असे श्रीदेवी यावेळी म्हणाल्या होत्या. श्रीदेवींचा राग साहजिकच होता. कारण त्या बॉलिवूडच्या सदाबहार अभिनेत्री होत्या.
लूक आणि मेकअप याबद्दल त्या कमालीच्या दक्ष होत्या. अगदी अखेरपर्यंत. लूक परफेक्ट असावे, याची त्या अतोनात काळजी घ्यायच्या. म्हणून एखाद्या इव्हेंटला जायचे म्हटले की, तयार व्हायला त्यांना अनेक तास लागत.श्रीदेवींच्या जाण्याने कपूर कुटुंबीयासोबतच जान्हवी आणि खुशीला मोठा धक्का बसला होता. जान्हवी तर आजही यातून सावरलेली नाही. कारण जान्हवी करण जोहर दिग्दर्शित ‘धडक’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होती. मुलीच्या बॉलिवूड डेब्यूबाबत श्रीदेवी कमालीच्या उत्सुक होत्या. मात्र लेकीचा पहिला चित्रपट पूर्ण होण्यापूर्वीच या ‘मॉम’ने जगाचा निरोप घेतला.