Join us

जेव्हा नितीन गडकरी ‘बिग बीं’ना म्हणाले होते, नाटक मत कर, रख नीचे फोन...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 3:19 PM

मजेदार आहे किस्सा!! गडकरी कामात व्यस्त होते. अचानक फोन वाजला. नंबर अनोळखी होता. तरीही गडकरींनी फोन उचलला आणि कौन बोल रहा है? असा प्रश्न केला...

ठळक मुद्देहा मजेदार किस्सा ऐकवताना गडकरींनी चुकून हे घडल्याचे सांगितले होते.

नितीन गडकरी ( Nitin Gadkari) आज देशातील वजनदार नेते आहेत. शांत, अभ्यासू आणि हसतमुख व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेले गडकरी त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठीही तितकेच प्रसिद्ध आहेत.  नितीन गडकरी यांचा आज (27 मे) वाढदिवस साजरा होत आहे. भारताचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री म्हणून ते उत्तम कामगिरी बजावत आहेत.गडकरी नागपूरचे. अशात शांत स्वभावाचे असले तरी कधीकधी ते सुद्धा नागपुरी खाक्या दाखवतातच. अगदी महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनाही त्यांनी एकदा असाच ‘नागपुरी खाक्या’ दाखवला होता. होय, किस्सा मजेदार आहे म्हणून आज आम्ही गडकरींच्या वाढदिवशी तो खास तुम्हाला सागणार आहोत. हा किस्सा स्वत: गडकरींनी ‘लोकसत्ता’च्या एका कार्यक्रमात सांगितला  होता.

तर हा किस्सा आहे 90 च्या दशकातील. महाराष्ट्रात भाजप-सेना युतीचे राज्य होते आणि नितीन गडकरी राज्यात परिवहन मंत्री होते.  मुंबई-पुणे एक्सप्रेस वेची निर्मिती त्यांच्याच कार्यकाळातील. अमिताभ बच्चन यांनी पहिल्यांदा या एक्सप्रेस वे वरून प्रवास केला, तेव्हा ते जाम खुश होते. अशात गडकरींच्या कामाचे कौतुक करावे म्हणून बिग बींनी त्यांना फोन लावला.

गडकरी कामात व्यस्त होते. अचानक फोन वाजला. नंबर अनोळखी होता. तरीही गडकरींनी फोन उचलला आणि कौन बोल रहा है? असा प्रश्न केला. पलीकडून  अमिताभ बच्चन असे उत्तर आले. गडकरी मात्र या नावाने वैतागले. नाटक मत कर, रख फोन नीचे म्हणून त्यांनी फोन कट केला, अमिताभ आपल्याला कशाला फोन करतील, कुणीतरी मस्करी करत असावे, असा गडकरींचा समज झाला होता.तितक्यात पुन्हा त्याच नंबरवरून फोन आला. गडकरींनी पुन्हा तो उचलला. मैं अमिताभ बच्चन बोल रहा हूं, असे खुद्द अमिताभ यांनी अतिशय गंभीरपणे सांगितल्यावर गडकरींचा विश्वास बसला. तेव्हा कुठे त्यांना त्यांची चूक उमगली.हा मजेदार किस्सा ऐकवताना गडकरींनी चुकून हे घडल्याचे सांगितले होते. सुरुवातीच्या काळात माझी आणि अमिताभ बच्चन यांची फारशी ओळख नव्हती. अशात त्यांचा कॉल मला अजिबात अपेक्षित नव्हता. त्यामुळे पहिल्यांदा माझी कोणीतरी मस्करी करत असल्याचे मला वाटले होते, असे त्यांनी सांगितले होते.

टॅग्स :अमिताभ बच्चननितीन गडकरी