सैफ अली खान, डिम्पल कपाडिया, तिग्मांशू धुलिया, कुमुद मिश्रा, सूनील ग्रोव्हर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या तांडव या वेब सीरिजची गेल्या कित्येक महिन्यांपासून चर्चा रंगली आहे. या वेब सीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आल्यापासून ही वेब सीरिज कधी प्रदर्शित होत आहे याची उत्सुकता लोकांना लागलेली होती. ही वेब सीरिज आता प्रदर्शित झाली असून या वेब सीरिजला प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. या बेव सीरिजमध्ये दाखवण्यात आलेल्या काही भागामुळे हिंदुंच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याचं सांगण्यात आलं आहे. यामुळे ही वेब सीरिज आता वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. दरम्यान, या वेब सीरिजमधून जोपर्यंत आक्षेपार्ह भाग काढला जात नाही तोवर यावर बहिष्कार टाकला जाईल, असा इशारा भाजपा नेते राम कदम यांनी दिला आहे. "का सतत चित्रपटांमध्ये आणि वेब सीरिजमध्ये हिंदू देवी-देवतांचा अवमान करण्याचं काम केलं जातं. त्याचं ताजं उदाहरण म्हणजे तांडव ही वेब सीरिज. सैफ अली खान पुन्हा एकदा अशा सीरिजचा भाग आहे ज्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. दिग्दर्शक अली अब्बास जफरला त्या सीरिजमधून भगवान शंकाराची मजा उडवणारा भाग काढून टाकावा लागणार आहे. अभिनेता झीशान आयुबलाही माफी मागावी लागणार आहे. जोवर आवश्यक ते बदल केले जाणार नाहीत, तोवर याचा बहिष्कार केला जाईल," असं राम कदम म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून याविषयी संताप व्यक्त केला.