आजपर्यंतच्या सर्वोत्तम भूमिकांपैकी एक ठरणार असलेल्या रेतीसम्राटाच्या भूमिकेतील किशोर कदम, चिन्मय मांडलेकर, विद्याधर जोशी, शशांक शेंडे, सुहास पळशीकर, संजय खापरे आदींच्या जबरदस्त अभिनयाने पॉवरपॅक झालेल्या ‘रेती’मधून प्रसिद्ध गायक शान याने मराठीत संगीत दिग्दर्शक म्हणून पहिले पाऊल टाकले आहे.अनिर्बंधपणे वाळूउपसा, ठिकठिकाणच्या नद्यांची केली जात असलेली वाळवंटे आणि या काळ्या साम्राज्यातून मिळणाऱ्या करोडोंच्या काळ्या पैशासाठी बेलगामपणे वावरत असलेले वाळूमाफिया, भ्रष्ट सरकारी अधिकारी, पोलीस आणि राजकारण्यांची साखळी यावर प्रखर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. कथा, पटकथा, संवाद देवेन कापडनीस यांचे असून, दिग्दर्शन सुहास भोसले यांनी केले आहे. भोसले यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘कोती’ या चित्रपटाला कोल्हापूर इंटरनॅशनल फेस्टिव्हलमध्ये ५ पुरस्कार लाभले असून, कान्स फेस्टिव्हलमध्ये रेती हा भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठविण्यात आला होता. देवेन कापडनीस यांचे ‘बरड’ आणि ‘होय साहेब’ हे दोन चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. वाळूउपशाच्या माध्यमातून पर्यावरणाची चाललेली अनिर्बंध लूट आणि असहाय जनता हे वास्तव मांडण्यासाठी रेती चित्रपटाची निर्मिती केली, असे या चित्रपटाचे निर्माते प्रमोद गोरे यांनी सांगितले. रेती बघितल्यानंतर तरुणाईत आणि संपूर्ण देशात एक वेगळा संदेश जाईल, जो कदाचित पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठीच्या मोठ्या चळवळीत परावर्तित होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. नाशिकच्या मोसम नदीपात्राचे जिवंत चित्रण असलेला ‘रेती’ गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मराठी चित्रपटसृष्टीत धडकतो आहे.
काळ्या साम्राज्याची ‘रेती’मधून पोलखोल
By admin | Published: March 27, 2016 2:09 AM