नितीन केणी यांची प्रस्तुती असलेला 'बोगदा' हा सिनेमा येत्या ७ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आई आणि मुलीच्या नात्यातील कंगोरे मांडणाऱ्या या सिनेमाचा नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर पोस्टर लाँँच करण्यात आला. निशिता केणी लिखित आणि दिग्दर्शित या सिनेमात अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांची प्रमुख भूमिका आहे.
'बोगदा' या सिनेमाच्या शीर्षकामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. मायलेकीच्या नात्यामधील विविध पैलू मांडणाऱ्या या सिनेमाचे पटकथा आणि संवादलेखन दिग्दर्शिका निशिका केणी यांनीच केले आहे. स्त्रीव्यक्तिरेखेवर आधारित असलेल्या या सिनेमाबद्दल बोलताना त्या सांगतात की,' स्त्रीप्रधान भूमिकेवर मराठीत कमी सिनेमे बनले आहेत. त्यामुळे बोगदा या सिनेमात मी स्त्रीव्यक्तिरेखाला अधिक महत्व दिले आहे. जगातल्या प्रत्येक आई आणि मुलीच्या नात्याचा वेध घेणारा हा सिनेमा असून, त्यांचे मतभेद आणि प्रेम या दोन्ही गोष्टींची नाजूक गुंफण या सिनेमात मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे'. इतकेच नव्हे तर, आशयसमृद्ध कलाकृतीने परिपूर्ण असलेल्या 'बोगदा' सिनेमाला 'व्हीस्लिंग वूड'च्या शिलेदारांचा मोठा हातभार लाभला आहे.
सिनेमाची दिग्दर्शिका स्वतः भारतातील या अग्रेसर फिल्म इंस्टीट्युटची विद्यार्थिनी असून, छायाचित्रकार प्रदीप विग्नवेळू, संकलक पार्थ सौरभ, ध्वनी मुद्रणकार कार्तिक पंगारे, वेशभूषाकार यश्मिता बाने हे पडद्यामागील कलाकारदेखील व्हीस्लिंग वूडचेच असल्याकारणामुळे, 'बोगदा' हा सिनेमा दर्जेदार कलाकृतीचा नमुनाच ठरणार आहे.या सिनेमाचे निर्माते करण कोंडे हे देखील व्हीस्लिंग वूडचे माजी विद्यार्थी असून, सुरेश पान्मंद, नंदा पान्मंद आणि दिग्दर्शिका निशिता केणी या चौकडीने मिळून 'बोगदा' सिनेमाची निर्मिती केली आहे.
मृण्मयी रसिकांना सुखद धक्का देणार आहे. दिग्दर्शिका ही नवी भूमिका ती रिअल लाईफमध्ये पार पाडणार आहे. मृण्मयीला नेहमीच काही ना काही हटके करण्याचा ध्यास होता. त्यातच दिग्दर्शन करणे हे तर तिचे सुरुवातीपासूनच स्वप्न होतं. 'के सरा सरा' या सिनेमापासून मृण्मयी दिग्दर्शनाची नवी इनिंग सुरु करत आहे. दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवण्यासाठी मृण्मयीकडे ३ ते ४ स्क्रीप्ट्स होत्या.गेल्या ४ वर्षांपासून ती यावर विचार करत होती. काही तरी आव्हानात्मक आणि वेगळे करण्याच्या विचारातून अखेर तिने 'के सरा सरा' या सिनेमाच्या कथेची निवड दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवण्यासाठी केली.या सिनेमाची कथा नातेसंबंधांवर आधारित असेल. मधुचंद्रानंतर पती पत्नीच्या नात्यात कसा ट्विस्ट येतो यावर आधारित हा सिनेमा असेल. हा सिनेमा वर्षअखेरीस रसिकांच्या भेटीला येईल.