Kesari-2 Teaser: बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) त्याच्या चित्रपटांमुळे कायमच चर्चेत राहिला आहे. सध्या अक्षय कुमार त्याच्या आगामी 'केसरी-२' चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. जवळपास ६ वर्षापूर्वी केसरी चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. केसरी' हा चित्रपट सारागढीच्या युद्धावर आधारीत आहे. ३६ व्या शीख रेजिमेंटचे २१ सैनिक आणि दहा हजार अफगाण सैनिकांमध्ये झालेल्या सारागढीच्या युद्धाची कथा या 'केसरी'मध्ये आहे. अक्षय कुमारनं या चित्रपटामध्ये साकारलेल्या ईश्वर सिंगच्या भूमिकेचे खूप कौतुक झालंय. त्यानंतर प्रेक्षकांना या चित्रपटाच्या सीक्वलची उत्सुकता निर्माण झाली होती. नुकताच 'केसरी-२' चा टीझर रिलीज करण्यात आला आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
दरम्यान, 'केसरी-२' या चित्रपटात अक्षय कुमार एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अक्षय कुमारने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर चित्रपटाचा टीझर शेअर केला. हा टीझर जवळपास १ मिनिट ३९ सेकंद इतका वेळ आहे. हा चित्रपट जालियनवाला बाग हत्याकांडाच्या कथेवर आधारित आहे. या चित्रपटामध्ये १९१९ च्या हत्याकांडामागील सत्य उलगडण्यासाठी बॅरिस्टर सी. शंकरन नायर यांचा संघर्ष दाखवण्यात येणार आहे. 'केसरी -२' मध्ये अक्षय कुमारसह बॉलिवूड अभिनेता आर. माधवन आणि अनन्या पांडे मुख्य भूमिकेत असणार आहे.
'केसरी-२' चित्रपटाचं दिग्दर्शन करण सिंग त्यागी यांनी केलं आहे. तर धर्मा प्रोडक्शनची निर्मिती आहे. येत्या १८ एप्रिलला सिनेमा जगभरात प्रदर्शित होत आहे.