Dilji Dosanjh Live Concert Video : अलिकडेच अभिनेता दिलजीत दोसांझ हा 'चमकिला' या चित्रपटामुळे चर्चेत आला होता. या चित्रपटात त्याने केलेला अभिनय प्रेक्षकांना प्रचंड आवडला. अभिनेत्री परिणीती चोप्रासोबत त्याने 'चमकिला'मध्ये स्क्रीन शेअर केली होती. अभिनयाबरोबरच गायनात निपुण असणाऱ्या दिलजीतने बॉलिवूडमध्ये आपलं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.
नुकताच अभिनेत्याने कॅनडा येथील टोरंटो शहरातील रॉजर्स सेंटर येथे लाईव्ह कॉन्सर्ट आयोजित केला होता. या कॉन्सर्टमध्ये चक्क कॅनडाच्या पंतप्रधानांनी त्याची भेट घेतली. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन टुड्रो यांनी दिलजीतला भर स्टेजवर जाऊन मिठी मारली. त्याची गळाभेट केली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
दिलजीत दोसांझने स्वत: च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये अचानक लाईव्ह कॉन्सर्टपूर्वी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन टुड्रो स्टेजवर येतात. हे पाहताच अभिनेता त्यांना दोन हात जोडून नमस्कार करतो. सुरूवातीला पंतप्रधानांना पाहून दिलजीतही थक्क झाला आहे.
काय म्हणाला दिलजीत?
सोशल मीडियावर याचा व्हिडिओ पोस्ट करत दिलजीतने कॅप्शन लिहलंय, "विविधता 'CA' ची ताकद आहे. पंतप्रधान जस्टिन नवा इतिहास पाहण्यासाठी आले आहेत. रोजर्स सेंटरमध्ये होणाऱ्या कॉन्सर्टच्या सगळ्या तिकिटांची आज विक्री झाली आहे".
अभिनेत्याला कॅनडाच्या पंतप्रधानांसोबत पाहून त्याचे चाहतेही प्रचंड खुश झाले आहेत. व्हिडिओवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. व्हायरल व्हिडिओवर 'पंजाबी छा गए ओए' अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे तर आणखी एका नेटकऱ्याने लिहलंय, 'इतिहास रचला गेला आहे'.
पंतप्रधान जस्टिन टुड्रोंनीही शेअर केला व्हिडिओ-
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन टुड्रो यांनी दिलजीतसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. "दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टआधी त्याचं मनोबळ वाढवण्याकरिता मी रोजर्स सेंटमध्ये थांबलो. कॅनडा एक महान देश आहे. जिथे पंजाबचा एक मुलगा इतिहास घडवू शकतो शिवाय या गर्दीचं कारणही होऊ शकतो. विविधता केवळ आपली ताकदच नाही तर एक महाशक्ती आहे", असं कॅप्शन देत जस्टिन टुड्रो यांनी पोस्ट शेअर केली आहे.