Avinash Wadhawan : बॉलिवूडच्या किंग खानने 'दीवाना' या सिनेमातून हिंदी सिनेसृष्टीत डेब्यू केला. शाहरुखचा हा पहिलाच सिनेमा होता. 'दीवाना' हा सिनेमा साधारणत: २५ जून १९९२ मध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. सुपरहिट ठरलेल्या या सिनेमात शाहरुख खानने दिव्या भारती आणि ऋषी कपूर यांच्यासोबत स्क्रिन शेअर केली होती. या सिनेमाला मिळालेल्या यशानंतर शाहरुखने कधीही मागे वळून पाहिले नाही.अनेक हिट सिनेमे देऊन तो बॉलिवूडचा बादशाह बनला. तेव्हा कोणालाही वाटलं नव्हतं की सहाय्यक अभिनेत्याचा रोल करणारा हा हिरो एक दिवस बॉलिवुडवर राज्य करेल.
मात्र, तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, हा चित्रपट शाहरुख खानने साईन करण्याआधी एका अभिनेत्याने नाकारला होता. बहुचर्चित 'दीवाना' या सिनेमासाठी शाहरुख नाही तर अभिनेता अविनाश वाधवन यांच्या नावाची वर्णी लागली होती. या चित्रपटासाठी 'बलमा' फेम अभिनेते अविनाश वाधवन दिग्दर्शकाची पहिली पसंत होते.
सध्या अविनाश छोट्या पडद्यावरील तेरी मेरी डोरियां या हिंदी मालिकेत इंदर सिंह बरार नावाची भूमिका साकारत आहेत. एका मुलाखती दरम्यान अविनाश यांनी दीवाना सिनेमा का नाकारला, यावर भाष्य केलं. ज्यावेळी दिग्दर्शक राज कंवर यांनी या चित्रपटासाठी अविनाश यांना ऑफर केली होती. त्यावेळी त्यांनी चित्रपटाचं संपूर्ण कथानक अभिनेत्याला ऐकवलं. पण दुसऱ्या हिरोची भूमिका मान्य नसल्याने मी या चित्रपटात काम करण्याठी नकार दिला. तसेच व्यग्र वेळेमुळे हा चित्रपट करणं मला शक्य नव्हतं. असं अविनाश वाधवन यांनी सांगितलं.