Aayushmann Khurrana: अभिनेता आयुषमान खुराणा (Aayushmann Khurrana) आणि भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) यांची मुख्य भूमिका असलेला 'दम लगा के हैशा' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. २०१५ मध्ये हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाच्या माध्यमातून भूमीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता जवळपास १० वर्ष उलटली आहेत. साधी कथा आणि कॉमेडी असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. दरम्यान, या चित्रपटाला १० वर्षे पूर्ण झाल्यानंतर याचनिमित्ताने आयुषमान खुरानाने त्याच्या आठवणी शेअर केल्या.
अभिनेता आयुषमान खुराणाने मीडियासोबत बातचीत करताना त्याच्या अभिनय प्रवासावर भाष्य केलं. त्याचबरोबर 'दम लगा के हैशा' चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी मला झोप यायची नाही, असा खुलासा त्याने केला. त्यादरम्यान, अभिनेता म्हणाला, "विकी डोनर' सिनेमामुळे मला स्टारडम मिळाला. परंतु आपल्या आणखी पुढे कसं जाता येईल, याचा मी प्रयत्न करत होतो. मी इंडस्ट्रीत नवीन असल्यामुळे नक्की काय करायचं? मला काहीच समजत नव्हतं. शिवाय मला मार्गदर्शन करणारं सुद्धा कुणीच नव्हतं. त्यामुळे मी घेतलेले बरेच निर्णय चुकीचे ठरले आहेत. याचा परिणाम असा झाला की माझे बॅक टू बॅक ३ चित्रपट फ्लॉप झाले. इंडस्ट्रीत कायम असं म्हटलं जातं की, दर शुक्रवारी आपला पुनर्जन्म होतो आणि त्यावरुन आपल्या करिअरची दिशा ठरते. मला फक्त इतकंच वाटायचं की, हा शुक्रवार माझा असावा अशी माझी इच्छा होती. पण, 'दम लगा के हैशा'च्या रिलीजपूर्वी मी पूर्णपणे नर्व्हस होतो, पण हा चित्रपट हिट झाला आणि त्यामुळे मला इंडस्ट्रीत एक नवी ओळख मिळाली."
पुढे अभिनेता म्हणाला,"दम लगा के हैशा' चित्रपटाने मला पुर्नजन्म दिला. या यशासाठी मी शरत कतारिया, मनीष शर्मा तसेच आदित्य चोप्रा आणि सहकलाकार भूमी पेडणेकरचे मनापासून आभार मानतो. याशिवाय अभिनेत्याने आपल्या इनस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे त्याने 'दम लगा के हैशा' च्या शूटिंग दरम्यानचा एक अनसीन फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. त्याचबरोबर आयुषमानने त्याच्या आठवणींना उजाळा दिला आहे.