'उडता पंजाब', 'सूरमा' यांसारख्या हिंदी चित्रपटात झळकलेला अभिनेता व गायक दिलजीत दोसांझ लवकरच 'गुड न्यूज' चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यानिमित्ताने त्याच्याशी केलेली ही बातचीत..
मराठी चित्रपटात काम करायला आवडेल
'गुड न्यूज' चित्रपटाबद्दल थोडक्यात सांग?आयव्हीएफ सारखा मुद्दा मनोरंजक पद्धतीने या चित्रपटात रेखाटण्यात आला आहे. आयव्हीएफमुळे बऱ्याच जोडप्यांना फायदा झाला आहे आणि यावरच आधारीत चित्रपटाची कथा आहे. त्यामुळे या विषयाची जनजागृतीदेखील लोकांमध्ये होईल. विशेष म्हणजे हा चित्रपट महिलांना खूप आवडेल.
या चित्रपटाचा अनुभव कसा होता?खूप छान अनुभव होता. चित्रपटाचं शूटिंग कधी संपलं हे कळलंदेखील नाही. सकाळी ६-७ वाजता आम्ही शूटिंगला सुरूवात करायचो आणि दुपारी १२ वाजता शूट संपायचे. गुड न्यूजआधी मी करिना कपूरसोबत उडता पंजाब चित्रपटात काम केलं होतं. त्यामुळे पुन्हा तिच्यासोबत काम करताना मज्जा आली. अक्षय कुमार व कियारा अडवाणीसोबत मी गुड न्यूज चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच काम केलं आहे. त्यांच्यासोबत काम करताना खूप छान वाटले. खूप चांगला अनुभव होता. सर्व स्टारकास्टसोबत काम करायला धमाल आली.
दिग्दर्शक राज मेहता यांच्याबद्दल काय सांगशील?राज मेहता यांनी पहिल्यांदाच दिग्दर्शन केलं आहे असं अजिबात वाटलं नाही. त्यांनी खूप छान दिग्दर्शन केलं आहे. त्यांना स्क्रीनवर काय दाखवायचं आहे हे चांगलं माहित होतं. त्यामुळे चित्रपट खूप छान झाला आहे.
तू जास्त पंजाबी भूमिका साकारताना दिसतो, यामागचं काय कारण आहे ?पंजाबी भूमिकाच मला जास्त ऑफर होतात. त्यामुळे मी पंजाबी व्यक्तीची भूमिका साकारताना दिसतो. मला मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मला मिळाली, तर मला नक्कीच आवडेल. मराठी चित्रपटाची कथा चांगली असेल तर मी मराठी चित्रपटात काम करेन.
तू सिंगिग व अॅक्टिंग अशा दोन्ही क्षेत्रात तू कार्यरत आहे, तर तुला कोणते क्षेत्र जास्त आवडते?मला गायन व अभिनय या दोन्ही गोष्टी खूप आवडतात. सिंगिग माझ्यासाठी ब्रेड अँड बटर आहे. अभिनय माझी आवड आहे.