बॉलिवूड अभिनेता इरफान खानच्या आई सईदा बेगम यांचे गत शनिवारी निधन झाले. वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पण इरफानला आईच्या अंत्यदर्शनसाठी जयपूरला जाता आले नव्हते. इरफानच्या मोठ्या भावाने आईवरचे अंत्यसंस्काराचे सोपस्कार पार पाडले. पण अंतिम क्षणी त्या माऊलीचा जीव इरफानमध्येच अडकून पडला होता. इरफान कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी लढत होता, हे तिला ठाऊक होते. आपण तर जाऊ पण आपला मुलगा इरफान या आजारातून बरा व्हावा, ही त्या माऊलीची अखेरची इच्छा होती. पण आता तिची ही इच्छा कधीच पूर्ण व्हायची नाही़ आई गेली आणि पाठोपाठ इरफानही हे जग सोडून गेला.
अखेरच्या क्षणापर्यंत सईदा लेकाच्या बरे व्हायची प्रार्थना करत होती. आपण गेलो तरी आपला मुलगा बरा होईल, बरा होऊन घरी परत येईल आणि आनंदात जगेल, ही त्या माऊलची प्रार्थना परमेश्वराने ऐकली नाही, हेच खरे... गेल्या काही वर्षांपासून इरफान कर्करोगाशी लढत होता.
२०१८ मध्ये इरफानला एंडोक्राइन नावाचा एक आजार झाला होता. याच्या उपचारांसाठी तो लंडनला गेला होता. एक वर्ष उपचार घेतल्यानंतर तो भारतात परतला होता. यानंतर त्याने एक अंग्रेजी मीडियम या सिनेमाद्वारे कमबॅकही केले होते. पण त्याचा हा चित्रपट अखेरचा सिनेमा ठरला. आता अनेकांचा आवडता इरफान कधीच परतायचा नाही...