जॉनचा नुकताच म्हणजेच १७ डिसेंबरला वाढदिवस झाला. जॉनने एक मॉडेल म्हणून त्याच्या करियरला सुरुवात केली. त्याने सुरुवातीच्या काळात अनेक रोमँटिक चित्रपटांमध्ये काम केले. त्यानंतर त्याने कॉमेडी, ॲक्शन चित्रपटांमध्ये काम करत तो सगळ्याच प्रकारच्या भूमिका साकारू शकतो हे सिद्ध केले. गेल्या काही वर्षांत त्याने एकाहून एक हिट चित्रपट दिले आहेत. तसेच त्याच्या अनेक भूमिकांसाठी त्याला पुरस्कार देखील मिळाले आहेत.
जॉनला जिस्म या पहिल्याच चित्रपटामुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली. त्याने साया, टॅक्सी नं 9211, मद्रास कॅफे, सत्यमेव जयते, परमाणू यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तो एक चांगला अभिनेता असण्यासोबतच त्याने एक निर्माता म्हणून देखील त्याची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. विकी डोनर या प्रसिद्ध चित्रपटाची त्याने निर्मिती केली होती.
जॉनचे लग्न झाले असून त्याच्या पत्नीचे नाव प्रिया आहे. अनेक अभिनेत्यांच्या पत्नी नेहमीच आपल्या पतीसोबत सार्वजनिक ठिकाणी उपस्थिती लावत असतात. पण प्रिया ही लाईमलाईटपासून दूर राहते. जॉन आणि प्रिया २०१४ मध्ये विवाहाच्या बंधनात अडकले. प्रियाचा जन्म अमेरिकेत झाला असून ती एक इन्व्हेस्टमेंट बँकर आहे. प्रिया मीडियापासून दूर का राहाते याविषयी एका मुलाखतीत जॉनने सांगितले होते. तो म्हणाला होता की, ‘मला पापाराझी कल्चर अजिबात आवडत नाही. विशेषत: मी पत्नीसोबत क्वालिट टाईम घालवत असताना मी अभिनेता नव्हे तर एक सामान्य माणूस असतो. मी प्रायव्हेट पर्सन आहे आणि माझी पत्नी प्रिया ही माझ्यापेक्षाही प्रायव्हेट पर्सन आहे. तिची हीच गोष्ट मला सर्वाधिक आवडते. प्रिया सतत कामात बिझी असते. पण पडद्यामागे राहून ती माझ्या कामांमध्ये मला मदत करत असते. सध्या ती माझी फुटबॉल टीम सांभाळतेय. एका टीमला हाताळणे कुठल्या प्रॉडक्शन टीमला हाताळण्यासारखे आहे.
प्रियासोबत लग्न करण्याअगोदर जॉनचे अभिनेत्री बिपाशा बसू हिच्याशी अफेयर होते. दोघे लग्न करतील असे सगळ्यांना वाटत होते. परंतु काही कारणास्तव त्यांचे ब्रेकअप झाले.