प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप (anurag kashyap) आणि मनोज बाजपेयी (manoj bajpayee) या जोडीने गँग्स ऑफ वासेपूर यांसारखा सुपरहिट सिनेमा इंडस्ट्रीला दिला. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर बराच गाजला. परंतु, या सिनेमानंतर या दोघांनी जवळपास ११ वर्ष एकमेकांसोबत काम केलं नाही. अलिकडेच मनोज बाजपेयीने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने अनुराग कश्यपसोबत इतकी वर्ष काम का केलं नाही यामागचं कारण सांगितलं.
'गँग्स ऑफ वासेपूर'पूर्वी अनुराग आणि मनोज बाजपेयी यांनी 'सत्या', 'शूल' यांसारख्या सिनेमात एकत्र काम केलं होतं. त्यावेळी मनोज बाजपेयी इंडस्ट्रीत स्ट्रगल करत होते. तर, अनुराग कश्यपदेखील असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करत होता. त्यानंतर या दोघांनी २०१२ मध्ये 'गँग ऑफ वासेपूर'मध्ये एकत्र काम केलं. त्यानंतर ही जोडी पुन्हा एकत्र आली नाही. दोघांच्या मैत्रीत फूट नेमकी कशामुळे पडली हे मनोज बाजपेयीने सांगितलं.अलिकडेच त्यांनी 'बॉलिवूड बबल'ला मुलाखत दिली.
"एका गोष्टीमुळे आमच्यात गैरसमज निर्माण झाला होता आणि याविषयी आम्ही एकमेकांशी कधी बोललोदेखील नाही. पण, सोशल मीडियावर या गोष्टीला खूप मोठं करण्यात आलं. आमचं एकमेकांशी बोलणं झालं नाही म्हणजे, मला वाटायचं मी ज्या पद्धतीच्या भूमिका साकारतो त्या पद्धतीचे ते चित्रपट करत नाहीयेत.आणि, त्यांना असं वाटत असेल की याला घ्यायची गरज नाहीये कारण, त्याचं करिअर आता फ्लॉप होतंय. त्यामुळे त्याला माझी गरज नव्हती आणि मला त्याची गरज नव्हती", असं मनोज बाजपेयी म्हणाले.
दरम्यान, मनोज बाजपेयी आणि अनुराग कश्यप या जोडीने राम गोपाल वर्मा यांच्या सत्या (१९९८) या सिनेमात पहिल्यांदा एकत्र काम केलं होतं. या सिनेमामध्ये मनोज बाजपेयी मुख्य भूमिकेत होते. तर, अनुराग कश्यपने लेखणाची जबाबदारी स्वीकारली होती.