Paresh Rawal Tweet: ज्येष्ठ उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा यांचं वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. अखेर बुधवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. रतन टाटा यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सामाजिक, राजकीय तसेच मनोरंजन विश्वातील कलाकार मंडळी रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहत आहेत. अशातच प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते परेश रावल यांनी सोशल मीडियावर केलेल्या ट्विटने अनेकांचं लक्ष वेधलं आहे. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी सरकारकडे विशेष मागणी केली आहे.
राष्ट्राची एकता, देशाची सुरक्षा, विकासाचे मुद्दे, कर्मचाऱ्यांचे हित यासाठी रतन टाटा हे त्यांचा वेगळा विचार व कार्याने प्रेरणादायी राहिले. भारताच्या विकासयात्रेत रतन टाटा यांचे मौलिक योगदान दिलं आहे. यावर अभिनेते परेश रावल यांनी ट्विट केलंय. या ट्विटमध्ये त्यांनी लिहलंय, "नवी मुंबई विमानतळाला श्री रतन टाटा यांचं नाव द्यावं" अशी मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. परेश रावल यांच्या व्हायरल होणारं ट्विट पाहून नेटकऱ्यांनीही त्याला समर्थन दर्शवलं आहे.
रतन टाटा यांनी टाटा समूहाला जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिली. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत बिघडली होती. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारांदरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या निधनानं संपूर्ण देशासह जगभरातूनही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.