Join us

"भारतात आजही सावरकरांचे विचार लागू..."; रणदीप हुड्डाने मनातली भावना स्पष्टच सांगितली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 9:47 AM

रणदीप हुड्डाला स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कारने सन्मानित करण्यात आलं. त्यावेळी रणदीप हुड्डाने सावरकरांबद्दल त्यांचं मनोगत व्यक्त केलं. (swatantryaveer savarkar, randeep hooda)

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४१ व्या जयंतीनिमित्त काल मुंबईत स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार सोहळ्याचं वितरण करण्यात आलं. अभिनेता रणदीप हुड्डा या पुरस्काराचा मानकरी ठरला. रणदीप हुड्डाने अलीकडेच सिनेमात साकारलेली सावरकरांची भूमिका प्रचंड गाजली. पुरस्कार स्वीकारल्यावर मनोगत व्यक्त करताना रणदीपने स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी त्यांच्या मनातल्या भावना व्यक्त केल्या. 

मी रागात सिनेमा बनवला कारण...

रणदीप हुड्डा हा पुरस्कार स्वीकारताना म्हणाला की, "स्वातंत्र्यवीर सावरकरांवर जेव्हा सिनेमा बनवायचा विचार केला तेव्हा मला याआधी त्यांच्याबद्दल माहित नव्हतं. मी जेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल वाचत गेलो, अभ्यास केला तेव्हा मला कळलं की, मला वजन कमी करुन बारीक व्हावं लागेल. काळ्या पाण्याच्या शिक्षेचा अनुभव घ्यावा लागेल वगैरे. सावरकरांचं संपूर्ण आयुष्य हे त्याग आणि बलिदानावर आधारीत आहे.  त्यांचं आयुष्य आजवर लोकांपर्यंत का पोहचवलं गेलं नाही? या रागाच्या भावनेत मी हा सिनेमा बनवला. सावरकरांचे विचार लोकांपर्यंत पोहचवावेत, हा स्पष्ट हेतू होता माझा.

मी स्वतःला भाग्यवान समजतो कारण...

रणदीप हुड्डा मनोगत व्यक्त करताना पुढे म्हणाला, "सावरकर फक्त महान स्वातंत्र्यसैनिक नव्हते तर ते कवी आणि थोर समाजसुधारक सुद्धा होते. भारतात आजही स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार लागू आहेत. सावरकरांची भूमिका मोठ्या पडद्यावर साकारायला मिळाली यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. लोकांना हा चित्रपट आवडला याचा मला आनंद आहे." दरम्यान रणदीप हूडाची प्रमुख भूमिका असलेला 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा झी 5 वर २८ मे पासून तुम्ही घरबसल्या बघू शकता.

टॅग्स :रणदीप हुडाविनायक दामोदर सावरकरभारत