Join us

तंतोतंत खरे ठरले ऋषी कपूर यांचे स्वत:च्या निधनाबद्दलचे 3 वर्षांपूर्वीचे ते शब्द...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2020 2:13 PM

ऋषी कपूर यांनी संतापाच्या भरात व्यक्त केलेली भावना दैवदुर्विलासाने खरी ठरली.

ठळक मुद्दे परिस्थितीच अशी ओढवली की, ऋषी कपूर यांच्या अंत्ययात्रेला कोणत्याही बॉलिवूड कलाकाराला सहभागी होता आले नाही. 

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर आज आपल्यात नाहीत. गेल्या 30 एप्रिलला त्यांना जगाचा निरोप घेतला. ऋषी कपूर यांच्या निधनाने देशभर शोककळा पसरली. दुर्दैव असे की, त्यांच्या निधनानंतर त्यांच्या चाहत्यांना त्यांचे अखेरचे दर्शन सुद्धा घेता आले नाही. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे त्यांच्या अंतिम यात्रेला मोजून केवळ 20  लोकांना सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली होती. यामुळे त्यांचे कुटुंबीयच तेवढेच त्यांच्या अंतिम यात्रेत सहभागी होऊ शकले. त्यांची स्वत:ची मुलगी रिद्धिमा सुद्धा लॉकडाऊनमुळे पित्याच्या अंत्यदर्शनाला मुकली. मृत्यूच्या 3 वर्षांपूर्वी ऋषी कपूर यांनी त्यांचे निधन व अंत्यसंस्काराबद्दल एक वक्तव्य केले होते. त्यांचे हे शब्द त्यांच्या निधनानंतर तंतोतंत खरे ठरले.होय,  28 एप्रिल 2017 ला त्यांनी ट्विटरवर  एक पोस्ट लिहिली होती. ‘ मी मरेन तेव्हा मला खांदा द्यायलाही कोणी नसेल,’ असे हे ट्विट होते. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते विनोद खन्ना यांच्या निधनानंतर त्यांनी हे ट्विट केले होते. या मागे एक पार्श्वभूमी होती.विनोद खन्ना यांच्या निधनानंतर संपूर्ण देश हळहळला होता. पण त्यांच्या अंत्ययात्रेला नवीन पिढीतील एकही कलाकार हजर नव्हता. यावर ऋषी कपूर यांनी नाराजी व्यक्त करत दोन ट्विट केले होते.

 ‘लज्जास्पद, विनोद खन्ना यांच्या अंत्यसंस्कारात या पिढीतील एकही कलाकार सहभागी झाला नव्हता. त्यांच्यासोबत काम केलेले कलाकारही हजर नव्हते. आदर करायला शिकले पाहिजे,’ असे पहिले ट्विट त्यांनी केले होते.

 दुस-या ट्विटमध्ये त्यांनी आपला संताप बोलून दाखवला होता. ‘असे का? मी आणि माझ्या नंतरच्यांनीही यासाठी तयार राहायला हवे. मी मरेन तेव्हा माझ्या मनाची तयारी असलीच पाहिजे. मला खांदा देणारेही कुणी असणार नाही. आजच्या तथाकथित नव्या कलाकारांचा खूप राग येतोय,’ असे त्यांनी आपल्या या दुस-या ट्विटमध्ये लिहिले होते.त्यांचे हे ट्विट शब्दश: खरे होईल, याची कुणी कल्पनाही केली नव्हती. त्यांचे हे शब्द तंतोतंत खरे ठरले. परिस्थितीच अशी ओढवली की, ऋषी कपूर यांच्या अंत्ययात्रेला कोणत्याही बॉलिवूड कलाकाराला सहभागी होता आले नाही.  त्यांच्या अंत्ययात्रेला फक्त त्यांच्या कुटुंबातले 20 सदस्य उपस्थित होते.  ऋषी कपूर यांनी संतापाच्या भरात व्यक्त केलेली भावना दैवदुर्विलासाने खरी ठरली.

टॅग्स :ऋषी कपूर