chandrayaan 3 update : आजचा बुधवारचा दिवस तमाम भारतीयांचं स्वप्न साकार करणारा ठरला. भारत आणि इस्रोच्या अंतराळ संशोधनाच्या इतिहासातील ऐतिहासिक क्षण अखेर आज सत्यात उतरला. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या महत्त्वाकांक्षी चंद्रमोहिमेतील चांद्रयान-३ नं आज मोठं यश मिळवलं. चांद्रयान-३ मधील विक्रम हा लँडर आज नियोजित वेळेनुसार संध्याकाळी सहा वाजून ४ मिनिटांनी चंद्राच्या पृष्टभागावर सुरक्षितरीत्या उतरला आणि इस्रोच्या शास्त्रज्ञांसह कोट्यवधी भारतीयांनी एकच जल्लोष केला. विविध क्षेत्रातील दिग्गजांनी या ऐतिहासिक क्षणाचा दाखला देत इस्रोच्या टीमसह तमाम भारतीयांचे कौतुक केले. बॉलिवूड अभिनेता शाहरूख खाननं खास चारोळ्या लिहत चांद्रयान-३ च्या यशावर आपला आनंद व्यक्त केला.
चांद्रयान-३नं चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केल्यानंतर एक संदेश पाठवला आहे. "मी यशस्वीपणे चंद्रावर पोहोचलो आहे आणि माझ्यासोबत संपूर्ण भारत या ठिकाणी पोहोचला आहे", अशा आशयाचा संदेश चांद्रयानाने पाठवला आहे. इस्रोने सोशल मीडियावर एक पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे.
शाहरूख खाननं या ऐतिहासिक क्षणांवर व्यक्त होताना म्हटलं, "चांद तारे तोड़ लाऊं…सारी दुनिया पर मैं छाऊं. आज भारत आणि इस्रोनं सर्वत्र आपली छाप सोडली आहे. सर्व शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचे अभिनंदन... भारताला अभिमान वाटावा यासाठी झटणाऱ्या सर्व हातांचं अभिनंदन. चांद्रयान-३ यशस्वी झालं आहे."
चांद्रयान-३ मोहीम यशस्वी ठरल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांसह इस्रोच्या संशोधकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आपल्याकडे पृथ्वीला आई तर चंद्राला मामा म्हटलं जातं. तर ‘चंदामामा दूर के’ हा वाकप्रचार आपल्याकडे प्रचलित आहे. मात्र आता तो बदलून चंदामामा टूक के असं म्हणावं लागेल, अशा शब्दांत मोदींनी या यशाचा आनंद व्यक्त केला.