Kapkapiii Movie: मराठीसह बॉलिवूड कलाविश्व गाजवणारा स्टार अभिनेता श्रेयस तळपदे लवकरच नव्या सिनेमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. श्रेयसने मराठी-हिंदीबरोबरच दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही त्याची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आता लवकरच तो एका बॉलिवूड चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हॉरर कॉमेडी असलेल्या 'कपकपी' या चित्रपटात श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांची मुख्य भूमिका आहे. गेल्या वर्षी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता श्रेयश-तुषारच्या या चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे.
प्रसिद्ध दिग्दर्शक संगीत शिवन यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. परंतु २०२४ मध्ये त्यांचं निधन झालं. त्यानंतर आता बऱ्याच कालावधीनंतर 'कपकपी' चित्रपटाच्या नव्या पोस्टरसह प्रदर्शनाच्या तारखेवरुन सुद्धा पर्दा हटविण्यात आला आहे. 'कपकपी' सिनेमा २३ मे २०२५ रोजी जगभरात प्रदर्शित करण्यात येणार आहे. हा चित्रपट २०२३ मध्ये आलेल्या मल्याळम ब्लॉकबस्टर 'थ्रणाशम'चा हिंदी रिमेक आहे.
'कपकपी' चित्रपटात श्रेयस तळपदे आणि तुषार कपूरसह सिद्धी इंदानी, अभिषेक कुमार, जय ठक्कर हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 'गोलमाल अगेन'नंतर श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सिनेरसिक सुद्धा प्रचंड उत्सुक आहेत.