Sunny Deol Movie: मागील काही महिन्यांपासून जुने चित्रपट पुन:प्रदर्शित करण्याचा ट्रेंड सुरु झाला आहे. प्रेक्षकांची मागणी लक्षात घेता अनेक चित्रपट निर्मात्यांनी जुने चित्रपट मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. गेल्या काही दिवसांमध्ये 'सनम तेरी कसम', 'करण अर्जुन','ये जवानी है दिवानी'सारखे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. प्रेक्षकांकडून सुद्धा या चित्रपटांना चांगलाच प्रतिसाद मिळाला. आता या यादीत आणखी एका मराठी चित्रपटाची भर पडली आहे तो चित्रपट म्हणजे 'घातक' आहे.
सनी देओलने (Sunny Deol) आपल्या कारकिर्दीत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्याने पडद्यावर अनेक अॅक्शन चित्रपट दिले. त्या चित्रपटांच्या यादीत 'घातक' या चित्रपटाचं नाव आवर्जून घेतलं जातं. १९९६ मध्ये प्रदर्शित झालेला घातक हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. शिवाय घातक मधील डायलॉग्ज देखील प्रचंड गाजले होते. राजकुमार संतोषी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. या चित्रपटात सनी देओलसोबत मिनाक्षी शेषाद्री आणि अमरिश पुरी मुख्य भूमिकेत होते. जवळपास २८ वर्षानंतर हा चित्रपट थिएटरमध्ये पुन: प्रदर्शित करण्यात येणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, येत्या २१ मार्चला हा सिनेमा रि-रिलीज करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
अभिनेता सनी देओल सध्या त्याचा आगामी 'जाट' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. लवकरच हा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ॲक्शन एंटरटेनर 'जाट'मध्ये अभिनेता सनी देओल मुख्य भूमिकेत आहे. सनीसोबत या चित्रपटात रणदीप हुड्डा, विनीत कुमार सिंग, रेजिना कॅसांड्रा, सैयामी खेर आणि स्वरूपा घोष सारखे दिग्गज कलाकार दिसणार आहेत.