संजय घावरे
कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमध्ये दिसलेला अभिनेता विक्रांत मेस्सी पुन्हा एकदा एका वेगळ्या रूपात समोर येणार आहे. तापसी पन्नूसोबत 'हसीन दिलरुबा' केल्यानंतर 'फॅारेन्सिक'मध्ये (Forensic) विक्रांत आता राधिका आपटेसोबत दिसणार आहे. सायकोलॅाजिकल थ्रिलर बनवण्यात तरबेज असणाऱ्या दिग्दर्शक विशाल फुरियांच्या 'फॅारेन्सिक'च्या निमित्तानं विक्रांतनं 'लोकमत'शी खास बातचीत केली.
'फॅारेन्सिक'मध्ये नेमकं काय पहायला मिळेल?
- हा मल्याळम चित्रपट 'फॅारेन्सिक'चा हा हिंदी रिमेक आहे. निर्मात्यांनी या चित्रपटात काम करण्याबाबत विचारल्यानंतर मी हा चित्रपट पाहिला. याचा छान हिंदी रिमेक होऊ याची मला ट्रिमेंडस पॅासिबिलिटी जाणवल्यानं होकार दिला. सायकोलॅाजिकल थ्रिलरच्या दुनियेत हा चित्रपट हिंदी प्रेक्षकांसाठी काहीतरी नवीन घेऊन आला आहे. फॅारेन्सिक सायन्सबाबत सर्वसामान्यांना फार काही माहित नसतं. या सिनेमाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत एक असं प्रोफेशन पोहोचवण्याचा प्रयत्न आहे, जे आपल्या लीगल सिस्टममध्ये महत्त्वाची भूमिका बजावतं. या चित्रपटामुळं फॅारेन्सिक सायन्सबाबत जाणून घेण्यास लोकांनाही आवडेल.
फॅारेन्सिक सायन्समधील कोणते वेगळे पैलू यात आहेत?
- फॅारेन्सिक सायन्स हे खूपच सोफेस्टिकेटेड प्रोफेशन आहे. ही सायन्सची एक अशी शाखा आहे, जी खूप न्याय व्यवस्थेमध्ये खूप महत्त्वाचं काम करते. आज जी टेक्नॅालॅाजी आपल्या देशात वापरली जाते त्याबाबत लोकांना माहित नाही. भारतातही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्ह्यांचा छडा लावला जात असल्याचं समजल्यावर त्यांनाही खूप अभिमान वाटेल. आपली फॅारेन्सिक सायन्स टेक्नॅालॅाजी जगातील आघाडीच्या फॅारेन्सिकच्या तोलामोलाची आहे. यापूर्वी आपण 'सीआयडी'मध्ये डॅाक्टर साळुंखेंना 'फॅारेन्सिक'च्या माध्यमातून गुन्ह्यांच्या तपासात मदत करताना पाहिलं आहे. या चित्रपटात वास्तवात वापरलं जाणारं अनोखं आणि आश्चर्यकारक तंत्रज्ञान पहायला मिळेल. नॅनो मिलिमीटरचा केसही गुन्हेगारापर्यंत पोहोवण्यासाठी पुरावा बनू शकतो.
चित्रपटाची कथा काय आहे?
- या चित्रपटाची कथा मसूरी या छोट्याशा गावातील आहे. इथे काही मुलींची हत्या होते आणि त्यांचा तपास करण्यासाठी तपास अधिकारी म्हणून राधिका आपटेची नेमणूक होते. त्याच प्रोसेसमध्ये फॅारेन्सिक एक्सपर्ट जॅानी खन्ना यांनाही बोलवलं जातं. हे दोघे मिळून कशा प्रकारे या केसचा तपास करतात, त्यांचं आपसातील नातं कसं आहे, त्यांचा भूतकाळ काय आहे आणि इमोशनली एकमेकांशी डील करत दोघेही कसे हत्याऱ्यापर्यंत पोहोचतात ते चित्रपटात पहायला मिळेल.
जॅानी साकारण्यासाठी कोणती तयारी केली?
- खूप रिस्पेक्टेबल आणि टफ प्रोफेशन असलेलं जॅानीचं कॅरेक्टर साकारणं ही खूप मोठी जबाबदारी होती. यासाठी फॅारेन्सिक साईंटिस्टसोबत थोडा वेळ घालवला. जॅाबचं स्वरूप काय असतं, त्यांचं टेक्निक्स काय असतं, त्यांचा माईंडसेट कसा असतो, हे पूर्ण सिस्टम कसं चालतं, त्यांचा दृष्टिकोन काय असतो या सर्व गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न केला. काही पर्सनल केस स्टडीजही केल्या. जॅानीचं कॅरेक्टर समजून घेऊन काम करणं खूप महत्त्वाचं होतं.
जॅानी स्वभावानं कसा आहे?
- जॅानी २८ वर्षांचा तरुण आहे. याचं 'फॅारेन्सिक' सायन्सवर प्रेम आहे. सर्वसामान्य लोकं क्राईम सीनवर रक्त वगैरे पाहून घाबरून जातात, पण याला हे सर्व आवडतं. हा स्वत:शीच बोलतो. स्वत:च प्रश्न विचारतो आणि उत्तरही देतो. कोणतीही गोष्ट जाणून घ्यायला कायम उत्सुक असतो. क्राईम सीनवर गेल्यावर खूप खूश होतो. न्याय व्यवस्था आणि माणुसकीवर विश्वास असलेल्या जॅानीमध्ये कमालीचा उत्साह आहे.
राधिकासोबतचा अनुभव कसा होता?
- राधिकासोबत काम करण्याची इच्छा होती, जी 'फॅारेन्सिक'नं पूर्ण केली. मागील तीन-चार वर्षांपासून आम्ही एकत्र काम करण्यासाठी प्रयत्न करत होतो, पण एकत्र येऊ शकलो नव्हतो. राधिका खूप चांगली अभिनेत्री आहे. खूपच सहकार्य करणारी असून, तिच्याकडे खूप चांगलं टेंम्प्रामेंट आहे. या चित्रपटात सोबतीला राधिकासारखी अभिनेत्री असल्यानं माझी हिंमत आणखी वाढली.
विशालच्या दिग्दर्शनातील खासियत काय?
- सायकोलॅाजीकल थ्रिलर या फॅारमॅटमध्ये विशाल फुरियांचा हातखंडा आहे. टेक्निकली खूप सक्षम आहेत. फिल्ममेकींगच्या सर्वांगांचं त्यांना ज्ञान आहे. माणूस म्हणून खूप संवेदनशीलही आहेत. त्यामुळं संवेदनशील गोष्टी तितक्याच संवेदनशीलतेनं हाताळण्याची कला त्यांच्याकडे आहे. विशालसोबत काम करताना मी त्यांच्यावर पूर्ण विश्वास टाकतो. त्यांचाही माझ्यावर विश्वास असतो. भविष्यात विशालसोबत सायकोलॅाजिकल थ्रिलरपेक्षा काहीतरी वेगळं करण्याची इच्छा आहे. त्यांच्यासोबत यापूर्वी काम केलं असल्यानं वेगळ्या प्रकारचं नातं आहे.
मराठी चित्रपटांमध्ये कधी दिसणार आहेस?
- मी मुंबईकर मुलगा आहे आणि इथेच मोठा झालो आहे. त्यामुळं मराठी चित्रपटांमध्येही अॅक्टींग करण्याची माझीही इच्छा आहे. जेव्हा कधी चांगली कथा येईल, तेव्हा नक्कीच मराठीत काम करेन. 'डोंबिवली फास्ट' तसंच विशालचा 'लपाछपी'सुद्धा चांगला सिनेमा होता. अशाप्रकारच्या मराठी चित्रपटांमध्ये काम करायला आवडेल.