'ओमकारा' सिनेमातील लंगडा त्यागीची भूमिका अभिनेता सैफ अली खानच्या करियरला कलाटणी देणारी ठरली. मात्र सैफच्या आधी बॉलिवूडमधील एका सुपरस्टारला ही भूमिका करायची होती. हा सुपरस्टार म्हणजे बॉलिवूडमधील मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान. तसे तो कोणत्याही भूमिकेसाठी सहज तयार होत नाही. मात्र ही भूमिका करण्यासाठी आमीर म्हणे खूप उत्सुक होता. याबाबतचा खुलासा नुकताच दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी केला आहे.
विशाल भारद्वाज यांनी सांगितले की, 'आमीर खानने त्यांना शेक्सपियरचे नाटक 'ओथेलो'वर सिनेमा बनवण्यासाठी प्रेरीत केले होते आणि त्याला स्वतःला या सिनेमातील लंगडा त्यागीची भूमिका करायची होती. मात्र त्याने एका वर्षानंतर चित्रपटावर काम सुरू करूयात असे सांगितले.त्यापूर्वी आम्ही एका चित्रपटात एकत्र काम करत होतो. पण, एक वर्षाच्या आत आमच्यात मतभेद झाले आणि सिनेमाचे काम थांबवावे लागले होते.'
जेव्हा 'ओमकारा' चित्रपटाची स्क्रीप्ट तयार झाली तेव्हा मी आमीरकडे गेलो नाही. कारण मला आणखीन प्रतीक्षा करायची नव्हती. त्यामुळे मी लंगडा त्यागीच्या भूमिकेसाठी सैफ अली खानला घेण्याचा विचार केला. मला वाटले की जर आमीर खान ह्या भूमिकेबाबत इतका उत्सुक आहे तर नक्कीच त्या भूमिकेत काही तरी खास असेल. जेव्हा मी सैफला या भूमिकेत काम करण्याबाबत विचारण्यासाठी गेलो तेव्हा त्याच्या डोळ्यात मला ही भूमिका करण्याची त्याची उत्सुकता दिसली. तसेही त्याला लवर बॉयच्या भूमिकेतून बाहेर पडायचे होते. अशाप्रकारे आमीर ऐवजी ही भूमिका सैफला मिळाली व त्याला या भूमिकेसाठी फिल्मफेअरचा पुरस्कारही मिळाला.