संपूर्ण देशवासीय ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत तो दिवस आज आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. साधु महंत आणि विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा भाग होणार आहेत. अनेक बॉलिवूडकरांनाही आमंत्रण मिळालं असून हळहळू तारे तारका अयोध्येत पोहचत आहेत. मुंबईतून निघताना कलीना विमानतळावर त्यांची झलक पाहायला मिळाली.
अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट, विकी कौशल, कतरिना कैफ, माधुरी दीक्षित, श्रीराम नेने, रोहित शेट्टी, आयुष्यमान खुरानासह अनेक सेलिब्रिटी कलीना एअरपोर्टवर दिसले. रणबीर कपूरने पारंपरिक धोतीकुर्ता परिधान केला. तर आलिया भट मोरपंखी साडीत दिसली. शिवाय अमिताभ बच्चन यांनीही कुर्ता पायजमा परिधान करत वर शाल ओढली आहे. मराठमोळी माधुरी दीक्षितने खास पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे. तर पती डॉ श्रीराम नेने यांनी पारंपरिक शेरवानी परिधान केली आहे. विकी-कतरिना ही जोडीही यावेळी पारंपरिक लूकमध्ये दिसली. सर्वच सेलिब्रिटींचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अमिताभ बच्चन, रजनीकांत, हेमा मालिनी, माधुरी दीक्षित, कंगना रणौत, आशा भोसले, अरुण गोविल, नितीश भारद्वाज, मधुर भांडारकर, प्रसून जोशी, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनाही राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. याशिवाय क्रिकेट जगतातील सचिन तेंडुलकर, विराट कोहली, हरभजन सिंग आणि अनिल कुंबळे यांसारख्या अनेक खेळाडूंना सुद्धा आमंत्रित करण्यात आले आहे.
रामललाची प्राणप्रतिष्ठा दुपारी १२:२० वाजता होणार आहे. त्यामुळे बहुप्रतीक्षित प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची प्रतीक्षा अवघ्या काही क्षणांपुरती राहिली आहे. या भव्यदिव्य सोहळ्यासाठी अयोध्यानगरी नववधूप्रमाणे सजली आहे. या सोहळ्यासाठी अयोध्येतील महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ ते राम मंदिरापर्यंतचा संपूर्ण मार्ग फुलांनी सजवण्यात आला आहे. तसेच या ऐतिहासिक सोहळ्यासाठी देश-विदेशातील मंदिरांमध्ये उत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे.