Indira Krishnan:बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि अभिनेत्री भूमिका चावला मुख्य भूमिकेत असलेला 'तेरे नाम' (Tere Naam) हा सिनेमा प्रचंड गाजला होता. २००३ मध्ये हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात आला होता. या सिनेमाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. राधे नावाचा कॉलेजमधला एक टपोरी युवक आणि साधी सरळ निर्जला यांची ही लव्हस्टोरी तुफान गाजली होती. सतीश कौशिक दिग्दर्शित हा सिनेमा ‘सेतु’ या तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक होता. अभिनेता सलमान खान त्याच्या मिश्कील स्वभासाठी ओळखला जातो. त्याच्या कामाच्या ठिकाणीही तो सेटवर हसतमुखाने वावरत असतो. त्यावेळी चित्रपटाच्या सेटवर एक मजेशीर किस्सा घडला होता. 'तेरे नाम' मधील एका सीनदरम्यान त्याने सहकलाकार अभिनेत्रीला घाबरवलं होतं. त्यावर अभिनेत्री इंदिरा कृष्णनने (Indira Krishnan) भाष्य केलं आहे.
इंदिरा कृष्णनने 'जॉइन फिल्म्स' या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सलमानसोबतच्या 'तेरे नाम'मधील एका सीन दरम्यानचा मजेशीर किस्सा शेअर केला. अभिनेत्री इंदिरा कृष्णन 'तेरे नाम'मध्ये निर्जराच्या (भूमिका चावला) च्या बहिणीच्या भूमिकेत पाहायला मिळाली. चित्रपटात अडचणीत सापडलेल्या निर्जराच्या बहिणीची सलमान सुखरूप सूटका करतो, असं दाखवण्यात आलं आहे. त्यादरम्यानचा एक किस्सा अभिनेत्रीने शेअर केला. या मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, "चित्रपटात आम्ही एका सीन शूट करत होतो, ज्यामध्ये मी सलमानच्या कानशिलात लगावते असं दाखवण्यात आलंय. परंतु तो सीन करण्यापूर्वी सलमान खानने मला वॉर्निंग दिली होती त्यामुळे मी प्रचंड घाबरले होते".
पुढे अभिनेत्रीने सांगितलं, "त्यावेळी सलमानने माझ्यासोबत वेगळ्याच अंदाजात बोलला होता. तो मला म्हणाला की थोडं जरी लागलं ना इंदिरा, तर मग बघ मी काय करतो. मी सेटवर गोंधळ घालेन. त्यानंतर तो सीन शूट करताना मी खूपच घाबरले होते. शूटवेळी सलमानला कानाखाली मारताना माझे हात थरथर कापत होते. पण, खरंतर तो खूप चांगला माणूस आहे. त्याच्यासोबत काम करताना मला मजा आली. 'तेरे नाम'च्या सेटवर अशा पद्धतीने सलमानने माझ्यासोबत प्रॅंक केला होता. असा मजेशीर किस्सा अभिनेत्रीने मुलाखतीत सांगितला.