Jacqueline Fernandez, money laundering case: बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस बुधवारी सुकेश चंद्रशेखरशी (Sukesh Chandrashekhar) संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीतील EOW कार्यालयात हजर झाली. या प्रकरणी अभिनेत्रीची तब्बल आठ तास चौकशी सुरू होती. DCP दर्जाच्या अधिकाऱ्यांनी तिच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. आजच्या दिवशी तिला तब्बल आठ तासांच्या चौकशीला सामोरे जावे लागले. सहसा अशा प्रकरणात सलग तीन-चार दिवसही चौकशी केली जाते, पण उद्या तिला चौकशीसाठी बोलावण्यात आलेले नाही. वरिष्ठ अधिकारी जॅकलिनच्या उत्तरांवर चर्चा करतील, त्यानंतर ते पुन्हा चौकशीसाठी बोलावायचे की नाही याचा निर्णय घेतील, असे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आधी पिंकी इराणी आणि जॅकलिनचे वेगवेगळे जबाब नोंदवण्यात आले, त्यानंतर समोरासमोर बसून दोघांची चौकशी करण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जॅकलिनने चौकशीदरम्यान काही प्रश्नांची उत्तरे देणे टाळले. अनेक प्रश्नांवर इराणी आणि जॅकलिनची उत्तरे जुळत नसल्याचेही निष्पन्न झाले. पिंकी इराणीनेच सुकेश चंद्रशेखर आणि जॅकलिन फर्नांडिस यांची भेट घडवून दिली होती.
तिसऱ्या समननंतर जॅकलीन चौकशीला झाली हजर
याआधीही दिल्ली पोलिसांच्या EOW शाखेने जॅकलिनला दोनदा चौकशीसाठी बोलावले होते. (१२ सप्टेंबर आणि २९ ऑगस्ट), मात्र जॅकलिन पोलिसांसमोर हजर झाली नाही. तिसरे समन्स जारी करत दिल्ली पोलिसांनी अभिनेत्रीला हजर राहण्याची सक्त सूचना दिली होती. त्यानंतर अखेर आज ती चौकशीला हजर झाली. मिळालेल्या माहितीनुसार, EOW च्या सहआयुक्त छाया शर्मा, विशेष आयुक्त रवींद्र यादव आणि सुमारे ५ ते ६ अधिकारी जॅकलिनची चौकशी करत आहेत.
जॅकलिनची चौकशी का?
ईडीने २१५ कोटींच्या फसवणुकीच्या प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसविरोधातही आरोपपत्र दाखल केले आहे. सुकेश चंद्रशेखरने तिला सुमारे ७ कोटी रुपयांचे दागिने गिफ्ट केल्याचा आरोप जॅकलिनवर आहे. याशिवाय मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे ९ लाख रुपये किमतीच्या ३ पर्शियन मांजरी, सुमारे ५२ लाख रुपये किमतीचा एक अरबी घोडा, १५ जोड्या इअर-रिंग्ज, कॉइल, डायमंड सेट, मौल्यवान क्रॉकरी, गुच्ची आणि चॅनेलसारख्या महागड्या ब्रँडच्या डिझायनर बॅग्ज, जीमी चू, गुच्ची या ब्रँड्सचे पोशाख, लुई व्हिटॉनचे शूज, दोन हमी ब्रेसलेट, एक मिनी कूपर कार तसेच महागडी रोलेक्स घड्याळे भेट दिली. एवढेच नाही तर जॅकलिनचे सुकेश चंद्रशेखरसोबतचे काही फोटो व्हायरल झाले होते. ईडीने आरोपपत्रात म्हटले आहे की, जॅकलिनला सुकेशच्या काळ्या कारनाम्यांची माहिती होती, परंतु तरीही तिने त्याच्या महागड्या भेटवस्तू स्वीकारल्या. त्यामुळे तिची चौकशी सुरू आहे.