बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसवर ( Jacqueline Fernandez) दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जॅकलिनची आई किमचं निधन झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून किम यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. परंतु आज त्यांची प्राणज्योत मालवली. जॅकलिन गेल्या अनेक दिवसांपासून आईच्या आजारपणामुळे चिंताग्रस्त होती. परंतु जॅकलिनच्या आईचं निधन झाल्याने अभिनेत्रीवर शोककळा पसरली आहे. बॉलिवूड कलाकारांनी आणि चाहत्यांनी जॅकलिनच्या आईला श्रद्धांजली वाहिली आहे.
जॅकलिनच्या आईवर सुरु होते उपचार
जॅकलिनची आई किम यांना काही दिवसांपूर्वी मुंबईतील हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अभिनेत्री अनेकदा आईला भेटण्यासाठी लीलावती रुग्णालयाबाहेर स्पॉट झालेली दिसली. जॅकलिनच्या आईवर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचा रिपोर्टही समोर आला.अभिनेता सलमान खान आणि जॅकलिनसोबत काम करणारे इतर सहकलाकारही जॅकलीनच्या आईला भेटायला गेले होते. परंतु अभिनेत्रीच्या आईची आज प्राणज्योत मालवली.
जॅकलिनच्या करिअरमध्ये तिच्या आईचा मोठा वाटा होता. त्यामुळे जॅकलिनच्या आयुष्यात आईचं छत्र हरपल्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दरम्यान जॅकलिनचे बॉलिवूडचे मित्र-मैत्रीण आणि इतर कलाकार अभिनेत्रीच्या आईचं अंतिम दर्शन घेण्यासाठी आणि तिला धीर देण्यासाठी लीलावती रुग्णालयात भेट देत आहेत.