Barfi Cinema: अनुराग बसू दिग्दर्शित 'बर्फी' हा सिनेमा २०१२ मध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट आजही प्रेक्षक तितक्याच आवडीने बघतात. या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor), प्रियंका चोप्रा (Priyanaka Chopra) आणि इलियाना डिक्रूज (Ileana Dcruz) यांची मुख्य भूमिका होती. यातील कलाकार, संवाद, गाणी यांची आजही चर्चा होत असते. पण यातील एका भूमिकेसाठी कतरिना कैफला विचारणा करण्यात आली होती. पण तिने या चित्रपटाला नकार दिला.
'बर्फी' हा सिनेमा जवळपास १३ वर्षांपूर्वी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनातही घर केलं. या सिनेमात अभिनेत्री इलियाना डिक्रुजने श्रुती घोष नावाचं पात्र साकारलं होतं. पण, तिच्याआधी कतरिना कैफला या प्रोजेक्टची ऑफर करण्यात आली होती. 'बर्फी' चे दिग्दर्शक अनुराग बासू यांनी अभिनेत्रीला चित्रपटाची संपूर्ण स्क्रिप्ट सांगितली होती. पण, काही कारणांमुळे तिने 'बर्फी' नाकारला. एकाच सिनेमात दोन अभिनेत्री असल्याची गोष्ट कतरिनाला खटकत होती, असं सांगण्यात येतं. त्यानंतर सिनेमात इलियानाला कास्ट करण्यात आलं.
याशिवाय, इलियानाने साकारलेल्या भूमिकेविषयी सांगायचं झालं तर, या चित्रपटातील तिच्या भूमिकेसाठी दिग्दर्शक अनुराग बसू यांनी त्यांच्या आईकडून प्रेरणा घेतली होती. त्यांची आई जशी तयार व्हायची त्या पद्धतीने चित्रपटात इलियानाचा लूक करण्यात आला होता. चित्रपटातील अनेक दृश्ये चार्ली चॅप्लिनच्या काळातील चित्रपटांपासून प्रेरित होती.
'बर्फी' ने बॉक्स ऑफिस चांगलच गाजवलं होतं. याशिवाय चित्रपटाला ८५ व्या 'बेस्ट फॉरेन लॅंग्वेज' चित्रपटासाठी नामांकन मिळालं होते. त्याचबरोबर या चित्रपटाने इंडियन बॉक्स ऑफिसवर जवळपास १०० कोटींची कमाई केली होती.