Shruti Haasan: साउथ सुपरस्टार कमल हसन यांची (kamal Haasan ) मुलगी अभिनेत्री श्रुती हसन (Shruti Haasan) नेहमी तिच्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत असते. बॉलिवूडसह दाक्षिणात्य सिनेसृष्टीत अभिनेत्रीने तिच्या अभिनयाने भलामोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. सध्या श्रुती हसन तिने केलेल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या आई-वडिलांच्या घटस्फोटावर भाष्य केलं आहे.
श्रुती हसनने नुकतीच 'पिंकविला'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये अभिनेत्री म्हणाली की, "माझा जन्म एका चांगल्या कुटुंबात झाला. घरातील सगळेच समजूतदार, कलाक्षेत्रात काम करणारे असल्याने कोणत्याच गोष्टींची कमी नव्हती. पण, मी याची दुसरी बाजूसुद्धा पाहिली आहे. जेव्हा माझे आई-वडील वेगळे झाले तेव्हा सगळ काही बदलून गेलं. त्याचवेळी मला आर्थिक स्वातंत्र्य आणि कोणावरही अवलंबून राहिल्यामुळे मिळणारं स्वातंत्र्य या सगळ्या गोष्टींचं महत्व समजलं. एक मुलगी म्हणून माझ्या आईला नात्यातून मुक्त होताना बघितलं. शिवाय यातून मला धडा देखील मिळाला की एका महिलेने स्वतंत्र असणं किती महत्वाचं असतं. "
पुढे श्रुतीने असेही म्हटले, "माझ्यासाठी ते दोघेही जेव्हा एकत्र होते तेव्हा ते जगातील सुंदर कपल होतं. कारण कामावर जात असताना, शूट असलं किंवा अजून कोणत्याही ठिकाणी जायचं असेल तर ते कायमच सोबत असायचे. माझं संपूर्ण कुटुंब फिल्म इंडस्ट्रीत काम करणार होतं. माझी बहीण अक्षरा इंडस्ट्रीत असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करत होती. "
"ज्यावेळी त्यांना वाटलं की ते एकमेकांबरोबर राहू शकत नाहीत, त्यावेळी त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. परंतु ते दोघेही आजही माझे पालक आहेत आणि याचा मला आनंद आहे. जर वेगळे होऊन ते आनंदी राहू शकत असतील तर हे आमच्यासाठी देखील चांगलं आहे." अस अभिनेत्रीने सांगितलं.