बॉलिवूडमधील (bollywood) बेधडक अभिनेत्री म्हणून तापसी पन्नूचा (Taapsee Pannu) कायमच उल्लेख केला जातो. बेधडक आणि रोखठोक मत मांडताना तापसी कधीही मागेपुढे पाहत नाही. 'चष्मे बद्दूर' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी तापसी लवकरच 'रश्मी रॉकेट' या चित्रपटात झळकणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. हा ट्रेलर पाहून काही जणांनी तापसीला तिच्या लूकवरुन ट्रोल केलं. विशेष म्हणजे तापसीनेदेखील तिच्या अंदाजात या ट्रोलर्सला प्रत्युत्तर दिलं. यापूर्वीदेखील तापसीने ट्रोलर्सला सडेतोड पद्धतीने उत्तरं दिली आहेत. त्यामुळे तापसी खऱ्या आयुष्यातदेखील त्याच स्वभावाची असल्याचं म्हटलं जातं. मात्र, तापसीचा स्वभाव पूर्णपणे वेगळा असून तिचं वागणं अत्यंत नम्रपणाचं आहे, असं अभिनेत्री सुप्रिया पाठक (supriya pathak) यांनी 'लोकमत ऑनलाइन'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
येत्या १५ तारखेला तापसीची मुख्य भूमिका असलेला रश्मी रॉकेट हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सुप्रिया पाठक यांनी तापसीच्या आईची भूमिका साकारली आहे. त्यानिमित्तानेच त्यांनी मुलाखत दिली होती. यावेळी त्यांनी तापसीच्या स्वभावातील अनेक गोष्टींचा उलगडा केला.
'ट्रोलिंग का करतात हेच समजत नाही'; सुप्रिया पाठक यांचा नेटकऱ्यांना सवाल
"सोशल मीडियावर बेधडकपणे व्यक्त होणारी तापसी खऱ्या आयुष्यात प्रचंड वेगळी आहे. ती सोशल नेटवर्किंगवर जितक्या बिंधास्तपणे, आक्रमकतेने बोलते तशी ती खऱ्या आयुष्यात नाही. ती फार वेगळी आहे. तिची ध्येय कोणती हे तिला माहित आहे आणि ती त्याच मार्गाने जातीये", असं सुप्रिया पाठक म्हणाला.
पुढे त्या म्हणतात, "तापसी प्रचंड स्ट्राँग मुलगी आहे. तिला आयुष्यात कोणती उंची गाठायची आहे, तिचे ध्येय काय आहेत हे तिचं सगळं क्लिअर आहे. मुळात ती कोणत्याच बाबतीत कन्फ्युज नाही. तिचं कामावर कायम लक्ष केंद्रित असतं. त्यामुळे ती अवांतर बडबड कधीच करत नाही. पण जर एखादा मुद्दा गंभीर असेल किंवा त्यावर बोलणं गरजेचं असेल तर तिने निश्चितपणे त्यावर बेधडकपणे व्यक्त व्हावं. पण ती खऱ्या आयुष्यात तशी नाही. ती सगळ्यांशी नम्रपणेच वागते."
दरम्यान, 'रश्मी रॉकेट' हा चित्रपट झी ५ वर प्रदर्शित होणार आहे. रॉनी स्क्रूवाला, नेहा आनंद, प्रांजल खंडडिया निर्मित या चित्रपटाचं दिग्दर्शन आकर्ष खुराना यांनी केलं आहे. या चित्रपटात तापसीसोबत सुप्रिया पाठक, अभिषेक बॅनर्जी, मनोज जोशी आणि सुप्रिया पिळगांवकर मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.