Zeenat Aman: १९७८ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सत्यम शिवम सुंदरम' या चित्रपटात अभिनेत्री झीनत अमान तसेच शशी कपूर मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले. हा राज कपूर दिग्दर्शित एक अजरामर चित्रपट आहे.या सिनेमाला इतकी वर्षे लोटली आहेत तरीही त्यातली गाणी, त्या सिनेमाची कथा लोकांच्या लक्षात आहे. या सिनेमात झीनत यांनी 'रुपा' नावाचं पात्र साकारलं होतं. अशातच झीनत अमान यांची चित्रपटात काम करण्याची संधी कशी मिळाली? यावर त्यांनी भाष्य केलं आहे.
नुकतीच सोशल मीडियावर झीनत अमान यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहलंय, "डिसेंबरमध्ये राज कपूर यांचा वाढदिवस आहे. आज मी तुम्हाला 'सत्यम शिवम सुंदरम' या चित्रपटासाठी माझी कशी निवड झाली? याबद्दल सांगणार आहे. १९७६ च्या दरम्यान आम्ही 'वकील बाबू' चित्रपटाची शूटिंग करत होतो. या चित्रपटात राज जी महत्त्वपूर्ण भूमिका साकारत होते. तर शशी कपूर आणि मी या चित्रपटात मुख्य भूमिकेत काम करणार होतो. शूटिंगच्या दरम्यान एखादा सीन शूट झाल्यानंतर तो सेट बदलला जायचा, लाईट ॲडजस्ट केली जात असे. या मधल्या काळात आम्हाला खूप वेळ मिळत असे तेव्हा सगळे जण एकत्र वेळ घालवायचे. त्यादरम्यान, राज यांच्या डोक्यात एका चित्रपटासाठील भन्नाट कल्पना होती तो चित्रपट बनवण्यासाठी ते खूप उत्साही होते".
पुढे त्यांनी म्हटलंय, 'बऱ्याचदा राज कपूर यांनी त्यांच्या या कल्पनेबद्दल आम्हाला सांगितलं होतं. एक पुरुष एका स्त्रीच्या आवाजाच्या प्रेमात पडतो परंतु तिच्या दिसण्यावरून तो स्वत: ला तिच्यापसून दूर ठेवतो. ते कायमच याबाबत तो मोकळेपणाने गप्पा मारायचे. त्यावेळी मी एक स्टार अभिनेत्री होते. पण मला ते त्यांच्या प्रोजेक्टमध्ये काम देणार नाहीत याबद्दल विचार करून मला बेचैन वाटत होतं. मला माहित होतं की छोटे कपडे माझी राहण्याची शैली या गोष्टी यासाठी कारणीभूत ठरत होत्या. मग मी राज कपूर यांच मतपरिवर्तन केलं".
"मला माहित होतं की राज कपूर त्यांचा मोकळा वेळ आरके स्टुडिओच्या मैदानात असलेल्या कॉटेज सेटवर घालवायचे. माझ्या असं ऐकण्यात आलं होतं की ते त्या ठिकाणी सभा घेत असत. शिवाय लहान कार्यक्रम देखील तिथे आयोजित केले जायचे. एकेदिवशी मी संध्याकाळी शूट लवकर आटोपल्यानंतर माझ्या ड्रेसिंग रूममध्ये अतिरिक्त ३० मिनिटे घालवली आणि स्वत:ला अगदी रूपाप्रमाणे तयार केलं. मी घागरा चोळी घातली, वेणी बांधली आणि मग गोंदण लावून टिश्यू पेपर चेहऱ्यावर चिकटवून चेहऱ्यावर डाग दाखण्याचा प्रयत्न केला. जेव्हा मी आरके स्टुडिओला पोहोचले तेव्हा जॉनने मला पाहताच नमस्कार केला. त्याने माझ्याकडे आश्चर्याने पाहिलं. मग मी त्याला सांगितलं की साहेबांना सांगा बाहेर 'रूपा' आली आहे. अशी माहिती झीनत यांनी या पोस्टद्वारे चाहत्यांना दिली आहे.
झीनत अमान यांनी बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. 'हरे रामा हरे कृष्णा', 'यादों की बारात' आणि 'दोस्ताना' या चित्रपटांमध्ये त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा आजही प्रेक्षक त्यांच्या लक्षात आहेत.