प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. कर्जतमध्ये असलेल्या त्यांच्या ND स्टुडिओ येथे त्यांनी त्यांचं जीवन संपवलं. त्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. नितीन देसाई यांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, त्यांच्याविषयी अनेक चर्चांना उधाण आलं आहे. यामध्येच सोशल मीडियावर त्यांच्याशी निगडीत अनेक किस्से चर्चिले जाऊ लागले आहेत. विशेष म्हणजे नितीन देसाई यांचं काम पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना गुजरातमध्ये येण्याचा सल्ला दिला होता.
एका मुलाखतीमध्ये नितीन देसाई यांनी त्यांच्या करिअरविषयी भाष्य केलं होतं. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला गुजरातमध्ये फिल्मसिटी उभारण्याचा सल्ला दिला होता. तसंच, त्यासाठी ५०० एकर जागा उपलब्ध करुन देतो असं आश्वासनही दिलं होतं.
काय म्हणाले होते नितीन देसाई?
"२००३ मध्ये नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी मी त्यांच्यासाठी ८० फूटांचं मोठं लोटस स्ट्रक्चर तयार केलं होतं. त्यांना ही कल्पना प्रचंड आवडली होती. त्यावेळी त्यांनी दिलेल्या भाषणामध्ये माझा उल्लेख मित्र असा केला होता. पण, त्यावेळी मी त्यांना भेटू शकलो नाही. मात्र, बरोबर २ दिवसांनी मला एक फोन आला आणि, 'मित्र नितीन देसाईंना नरेंद्र मोदींचा नमस्कार' असा समोरुन आवाज आला. मी तो आवाज ऐकूनच स्तब्ध झालो. त्यांनी मला भेटायला बोलावलं", असं नितीन देसाई म्हणाले होते.
ND स्टुडिओमध्ये नितीन देसाईंनी संपवलं जीवन; पाहा, 43 एकर जागेतील स्टुडिओचे Inside photos
पुढे ते म्हणतात, "त्यांची भेट घेतल्यावर जवळपास ४५ मिनिटांपर्यंत आमची चर्चा झाली. या चर्चेमध्ये शेवटच्या ४ मिनिटांमध्ये त्यांनी मला विचारलं, तुला काय करायची इच्छा आहे? मी म्हटलं, तुमच्याकडे खरंच ४ मिनिटं वेळ आहे? त्यांनी होकार दिला. आणि, मी लगेच त्यांना माझं एक प्रेझेंटेशन दाखवलं. माझं प्रेझेंटेशन पाहून ते भारावून गेले. मला म्हणाले, महाराष्ट्र आणि राजस्थानला लागून गुजरातची जितकी बॉर्डर आहे ती तुझी. मी तुला ५०० एकर जमीन देतो. तू तिथे फिल्मसिटी उभी कर. त्यांची ही ऑफर ऐकून मी भांबावून गेलो. परंतु, गुजरातमधील खराब हवामान आणि प्रतिकूल परिस्थिती लक्षात घेता तिथे स्टुडिओ उभारण शक्य नव्हतं."
दरम्यान, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतरही नितीन देसाई यांनी त्यांच्यासोबत काम केलं. पंतप्रधान मोदींसोबत त्यांनी ६७ इव्हेंट केले.स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या इनॉग्रेशन प्रोग्रामसाठीही नितीन देसाईंनी काम केलं होतं.