आमिर खानसारख्या सुपरस्टारसोबत डेब्यू आणि सलमान खानसोबत दोन सुपरडुपर हिट चित्रपट दिले म्हटल्यावर तुमचे नाव बॉलिवूडच्या टॉप लीगमध्ये घेतले जाईल. पण ही अभिनेत्री याला अपवाद ठरली. होय, करिअरच्या शिखरावर असताना तिने लग्न केले आणि बॉलिवूडच्या ग्लॅमरस दुनियेला अलविदा म्हणत संसारात रमली. आम्ही बोलतोय ते असिन थोटुम्मकल या अभिनेत्रीबद्दल. असिन नावाने ओळखली जाणारी आणि बॉलिवूडच नव्हे तर कॉलिवूड गाजवणारी असिन सध्या तिच्या संसारात आनंदी आहे.
2001 पासून साऊथच्या सिनेमात काम करणा-या असिनने 2008 साली आमिर खानसोबत ‘गजनी’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ‘गजनी’ ब्लॉकबस्टर ठरला आणि असिनच्या दाराबाहेर निर्माता-दिग्दर्शकांच्या रांगा लागल्या. दुस-याच वर्षी ‘लंडन ड्रिम्ज’मध्ये ती सलमानसोबत झळकली. अर्थात हा सिनेमा फार कमाल दाखवू शकला नाही. पण असिनच्या अभिनयावर सलमान फिदा झाला आणि तिला त्याच्याच दुस-या सिनेमात संधी मिळाली. 2011 मध्ये सलमानसोबत ती ‘रेडी’ या सिनेमात झळकली. या सिनेमाने मात्र कमाल केली आणि तिकीट खिडकीवर 100 कोटींचा बिझनेस केला. असिनची जणू लॉटरी लागली. पण ती कमालीची चूजी होती.
‘रेडी’नंतर अक्षय कुमारसोबत ‘हाऊसफुल 2’मध्ये दिसली. यानंतर ‘बोल बच्चन’, ‘खिलाडी 786’मध्ये ती झळकली. हे तिन्ही सिनेमे हिट झालेत. आमिर, सलमान, अक्षय कुमारसोबत काम करण्याची संधी मिळणे खरे तर प्रत्येक अभिनेत्रीचे स्वप्न असते. पण असिनने अगदी गुपचूप बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला. 2015 मध्ये आलेल्या ऑल इज वेल या सिनेमात अभिषेक बच्चनसोबत ती शेवटची दिसली. त्यानंतर मात्र तिने इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला आणि राहुल शर्मासोबत संसार थाटला.
9 जानेवारी 2016ला दिल्लीमध्ये मायक्रोमॅक्स कंपनीचा को-फाऊंडर असलेल्या राहुल शर्मासोबत विवाहबंधनात अडकत असिनने सगळ्यांना आश्चयार्या धक्का दिला. असिनने आधी राहुलसोबत चर्चमध्ये आणि नंतर हिंदु पद्धतीनुसार लग्न केले होते. राहुल आणि असिनची ओळख अक्षय कुमारने करून दिली होती.
लग्नानंतर सिनेमात काम न करण्याचा निर्णय असिनने घेतला. आपल्या या निर्णयावर ती आजही ठाम आहे. तिने याबाबतचा खुलासा केला होता. ‘लग्नापूर्वी मी माझ्या सगळ्या प्रोफेशनल कमिटमेंट पूर्ण केल्या होत्या आणि आता कुठलाही प्रोजेक्ट स्वीकारणार नाहीय,’ असे तिने म्हटले होते. करिअरमधून ब्रेक घेत ती आता संसारात रमली. असिनला एक मुलगी आहे आणि संसारात रमलीय.