Remo Dsouza : प्रसिद्ध डान्स कोरिओग्राफर रेमो डिसूझा(Remo Dsouza) आणि पत्नी लिझेल वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या पती-पत्नीवर मीरारोड येथील एका डान्स ग्रुपची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर व्हि अनबिटेबल या डान्स ग्रुपची तब्बल १२ कोटींची फसवणुक केल्याचा आरोप करण्यात आलाय. डान्स ग्रुपने तक्रार करुनही कोणतीच कारवाई न झाल्याने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. रेमो डिसुझासह त्याची पत्नी आणि इतर ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावर आता रेमो डिसूझाने अखेर मौन सोडलं आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर रेमोसह पत्नी लिझेलने एक पोस्ट शेअर केली आहे. त्याद्वारे त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहलंय, "मीडियारिपोर्टद्वारे एका डान्स ग्रुपने माझ्यावर आणि माझ्या पत्नीवर गंभीर स्वरुपाचे फसवणूकीचे आरोप लावले आहेत. या प्रकरणाची माहिती मिळताच मला त्याचं अत्यंत वाईट वाटलं की, अशी माहिती प्रकाशित करण्यात आली आहे. योग्य वेळ आली की आम्ही त्यावर उत्तर देऊ. तोपर्यंत आम्ही अधिकाऱ्यांना तपासामध्ये योग्य ते सहकार्य करु जे आतापर्यंत करत आलो आहोत. या सगळ्या परिस्थितीत आमचे कुटुंबीय, मित्र-मैत्रीणी तसेच चाहत्यांकडून मिळणाऱ्या पाठिंब्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो".
रेमो डिसुझा हा बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध डान्सर आणि कोरिओग्राफर आहे. 'डान्स इंडिया डान्स' या शोमध्ये परिक्षकाच्या भूमिकेत त्याने अनेक डान्सर घडवले. रेमो डिसुझासह त्याची पत्नी आणि इतर ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यामुळे रेमो डिसुझा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.