बॉलिवूडच्या प्रेमप्रकरणांची जशी चर्चा होते, तशीच इथल्या कोल्डवॉरचीही चर्चा होतेच. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या कोल्डवॉरच्या अनेक कथा-कहाण्या वेळोवेळी ऐकायला मिळतात. असाच एक किस्सा एका घडून गेलेल्या कोल्डवॉरचा. होय, सोनम कपूर (Sonam Kapoor) व अभय देओलचा ‘आयशा’ हा सिनेमा तुम्हाला आठवत असेलच. हा सिनेमा रिलीज झाला आणि अभय देओल ( Abhay Deol) व कपूर कुटुंबात काहीतरी बिनसल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. ( Abhay Deol & Anil Kapoor’s War Of Words)
‘आयशा’ या चित्रपटात अभय देओल आणि अनिल कपूरची (Anil Kapoor) लेक सोनम कपूर लीड रोलमध्ये होते. म्हणायला अभय देओल या चित्रपटाचा हिरो होता. पण चित्रपट पाहून जणू तो जणू काही बिथरला होता. निर्मात्यांनी ‘आयशा’ची कथा व अन्य गोष्टींपेक्षा सोनम कपूरच्या कपड्यांवर आणि लुक्सवर जास्त पैसा खर्च केला, ही गोष्ट म्हणे अभयला त्यावेळी खटकली होती. एका मुलाखतीत अभयनं मनातली ही नाराजी बोलून दाखवलीच आणि इथूनच त्याच्यात व कपूर घराण्यात बिनसल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.‘आयशा हा सिनेमा जेन ऑस्टेनच्या कादंबरीवर आधारित असायला हवा होता. पण याला 2 तासांचा फॅशन शो बनवला गेला,’ असं अभय देओल एका मुलाखतीत म्हणाला होता. विशेष म्हणजे, यानंतर ‘आयशा’च्या अनेक प्रमोशन इव्हेंटमधूनही तो गायब होता.
आणखी एका मुलाखतीत त्यानं ‘आयशा’वरची नाराजी अधिक स्पष्टपणे बोलून दाखवली होती. ‘मी माझ्या आयुष्यात कधीही आयशा सारख्या चित्रपटाचा भाग बनू इच्छित नाही. मला करायचा होता, तसा तो सिनेमा नव्हता,’असं तो म्हणाला होता. साहजिकच त्याचे हे शब्द सोनम कपूर व अनिल कपूर या दोघांच्याही जिव्हारी लागले होते आणि कदाचित इथूनच अभय व कपूर कुटुंबात कोल्डवॉर सुरू झालं होतं.
याचदरम्यान सोनम आपल्या बाबासोबत म्हणजे अनिल कपूरसोबत ‘कॉफी विद करण 4’मध्ये आली आणि हे कोल्डवॉर जगजाहिर झालं. ‘अभय देओलला मदतीची गरज आहे. या पोरात खूप काही गडबड आहे,’असं अनिल कपूर या शोमध्ये म्हणाला होता. साहजिकच अभयनेही यावर अनिल कपूरला जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. ‘अनिल कपूर जे बोलले ते खरं आहे. मी चुकतोय आणि आयशा हा सिनेमा याचं सर्वात मोठं उदाहरण आहे. हो, मला मदतीची गरज आहे. मी त्यांच्यासारख्या लोकांचा आदर्श घेऊ नये, यासाठी मला मदतीची गरज आहे. त्यांनी माझा वेळ वाया घालवला,’असं अभय म्हणाला होता.
या कोल्डवॉरनंतर सोनम कपूर व अभय देओल कधीही एकत्र दिसणार नाही, असाच अंदाज होतात. पण पुढे ‘रांझणा’मध्ये अभय व सोनम एकत्र काम केलं, तो चाहत्यांसाठी सुखद धक्का होता. कदाचित यालाच बॉलिवूडच्या भाषेत प्रोफेशनलिज्म म्हणतात.