सोशल मीडियाच्या दुनियेत टोलिंग, सायबर बुलिंग किंवा मग धमक्या देणे जणु सामान्यबाब होत चाललीये. एखाद्याने स्वत:चे विचार मांडलेत आणि दुसरा त्याच्याशी सहमत नसेल तर संबंधित व्यक्तिला ट्रोल केले जाते. बॉलिवूडचे सेलिब्रिटी अनेकदा ट्रोल होतात. अनेक सेलिब्रिटी तर सायबर बुलिंगचेही शिकार झालेले आहेत. काहींना रेप, अॅसिड अटॅकची धमकीही मिळाली आहे. आता मात्र या सायबर बुलिंगविरोधात संपूर्ण बॉलिवूड एकवटल्याचे पाहायला मिळते आहे. सध्या सोशल मीडियावर #IndiaAgainstAbuse ट्रेड होतोय.
सोनम कपूरपासून दीया मिर्झापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी याविरोधात आवाज उठवत सायबर बुलिंग थांबवण्याची मागणी केली आहे. इतकेच नाही तर यासंदर्भात एक ऑनलाईन याचिकाही दाखल करण्यात आली आहे. महिलांविरोधात सोशल मीडियावर सुरु असलेले सायबर बुलिंग थांबवणे हा यामागचा उद्देश आहे. ‘आता खूप झाले. सोशल मीडियावरचे सायबर बुलिंग रोखण्याची वेळ आलीये. या ऑनलाईन याचिकेवर स्वाक्षरी करा आणि #IndiaAgainstAbuse सोबत आपला आपला आवाज उठवा,’ असे सोनम कपूरने लिहिले आहे.
दीया मिर्झा, कोंकणा सेन शर्मा, मीरा चोप्रा, अहाना कुमरा यासारख्या अभिनेत्रींनी या ऑनलाईन याचिकेवर स्वाक्षरी केली आहे. शिवाय अनेक सामान्य लोकही या मोहिमेशी जोडले जात आहेत.
गेल्या काही दिवसांत सायबर बुलिंगचे प्रमाण प्रचंड वाढले असल्याचे पाहायला मिळतेय. नुकतेच ‘दिल बेचारा’ या चित्रपटाची अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जी हिने तिला रेप व अॅसिड हल्ल्याची धमकी मिळत असल्याचा आरोप केला होता. अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिनेही असाच आरोप केला होता. हे बघता बॉलिवूडने याविरोधात एकजूट होण्याचा निर्णय घेतला.