दीपिका पदुकोण (Deepika Padukone) हे नाव घेतलं की अनेकांच्या डोळ्यासमोर तिची गोड स्माइल असलेला चेहरा येतो. 'ओम शांती ओम' या सिनेमातून दीपिकाने इंडस्ट्रीत पदार्पण केलं आणि पाहता पाहता बॉलिवूडवर राज्य केलं. आज बी टाऊनमधील लोकप्रिय आणि दिग्गज अभिनेत्रींमध्ये तिचं नाव आवर्जुन घेतलं जातं. दीपिकाने आजवरच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं. परंतु, तिची 'ओम शांती ओम'मधली भूमिका विसरणं कोणालाही शक्य नाही. विशेष म्हणजे कोणतही ओडिशन न देता तिची या सिनेमात वर्णी लागली होती.
दिपिकाने एका मुलाखतमध्ये 'ओम शांती ओम' या सिनेमाच्या सिलेक्शनचा किस्सा सांगितला होता. या सिनेमात तिची एन्ट्री कशी झाली, शाहरुखसोबत स्क्रीन शेअर करण्याचा अनुभव कसा होता, कोणत्याही ऑडिशनशिवाय तिला थेट शाहरुखच्या अपोझिट कसं काय घेतलं? यावर तिने एकंदरीत भाष्य केलं.
"मी जे सांगते त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण, ज्यावेळी माझ्याकडे या सिनेमाची ऑफर आली त्यावेळी मला प्रश्न पडला की, बिग बजेट असलेल्या या सिनेमात कोणतंही ऑडिशन न घेता मला डायरेक्ट एवढ्या मोठ्या सुपरस्टारच्या (शाहरुख खान) अपोझिट कसं काय सिलेक्ट केलं?", असं दीपिका म्हणाली.
पुढे ती म्हणते, "आज काही वर्ष मागे वळून पाहिल्यानंतर जाणवतं की, मी त्यावेळी तरुण, साधी आणि स्वत: मध्येच मग्न असायचे. पण, तरी मी त्या परिस्थितीत खूप सुरक्षित फील करायचे. मला ते लोक पॅम्पर करतील अशी मी अपेक्षा कधीच ठेवली नव्हती. कारण, त्यावेळी सेटवर सगळेच दिग्गज होते. परंतु, त्यांनी (फराह खान, शाहरुख खान) माझी खूप काळजी घेतली. ते सेटवर माझ्याशी इतकं छान वागायचे की ज्यामुळे मी सिनेमात सहज अभिनय करु शकले. ज्यावेळी सिनेमाचं प्रमोशन सुरु झालं त्यावेळी त्यांनी मला असं प्रेझेंट केलं ज्यामुळे रातोरात माझं नशीब बदलून गेलं." दरम्यान, दीपिका लवकरच कल्की 2898 AD या सिनेमात झळकणार आहे. त्यामुळे सध्या ती या सिनेमामुळेही चर्चेत येत आहे.