Amitabh Bachchan: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा जगभरात भलामोठा चाहतावर्ग आहे. अमिताभ बच्चन यांनी आपल्या फिल्मी कारकिर्दीत एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. सध्याच्या घडीला सिनेइंडस्ट्रीत त्यांचं नाव मोठ्या अदबीने घेतलं जातं. त्यांच्या चित्रपटांची क्रेझ आजही चाहत्यांमध्ये पाहायला मिळते. ९० च्या दशकातील 'मोहब्बतें' या चित्रपटाचा एक वेगळाच फॅनबेस आहे. २००० साली हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. आजही या चित्रपटातील गाणी, कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. 'मोहब्बतें' चित्रपटात अमिताभ बच्चन, शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) यांसारख्या कलाकारांची फौज पाहायला मिळाली. यश चोप्रा दिग्दर्शित हा सिनेमा त्याकाळी बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजला. परंतु अभिनेते अमिताभ बच्चन यांनी त्यावेळी 'मोहब्बतें'साठी फक्त एक रुपया इतकं मानधन घेतल्याचं सांगितलं जातं.
नुकतीच प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपट निर्माते निखिल अडवाणी यांनी 'रेडिओ मिर्ची'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी सध्याची फिल्म इंडस्ट्री आणि आधीच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये कसं वातावरण असायचं यावर भाष्य केलं आहे. त्यादरम्यान मुलाखतीत निखिल अडवाणी म्हणाले की," सिलसिला चित्रपट करताना दिग्दर्शक यश चोप्रा यांनी अमिताभ बच्चन यांना मानधनाबद्दल स्पष्टपणे विचारलं. त्यावेळी मानधन म्हणून तुम्ही किती पैसे घ्याल? अशी विचारणा त्यांनी केली होती. तेव्हा अमिताभ बच्चन त्यांना म्हणाले होते की, मला स्वत: चं घर खरेदी करायचं आहे. त्यामुळे यावेळी तुम्ही मला चांगली रक्कम द्या. असं त्यांनी यश चोप्रा यांना सांगितलं."
पुढे निखिल अडवाणी यांनी म्हटलं , "त्यानंतर यश चोप्रा यांनी 'मोहब्बतें' साठी अमिताभ बच्चन यांना कास्ट केलं. त्यावेळीही त्यांनी 'बिग बीं'ना मानधनाबद्दल विचारलं. तेव्हा ते म्हणाले, त्यावेळी घरासाठी मी जेवढं मानधन तुमच्याकडे मागितंल तेवढं तुम्ही दिलं. आता मी फक्त एक रुपया मानधन घेणार आहे. तेव्हा अमिताभ बच्चन फक्त बोललेच नाहीत तर त्यांनी खरंच एक रुपया इतकं मानधन घेतलं."
"त्याकाळी चित्रपट पैशांमुळे नाही तर नात्यांच्या मजबुतीमुळे बनायचे. पण, आता तसं होतं नाही. चित्रपटापूर्वी पैशांचं गणित मांडलं जातं. पूर्वी इंडस्ट्रीत कुटुंबाप्रमाणे वातावरण असायचं. परंतु आता चित्र काही वेगळंच आहे." असा खुलासा त्यांनी या मुलाखतीमध्ये केला.