नवी दिल्ली - बॉलिवूडचा दिग्गज निर्माता-दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) याने त्याचा 50 वा वाढदिवस मोठ्या दणक्यात साजरा केला. यशराज फिल्म्स स्टुडिओमध्ये करणच्या वाढदिवसाची जंगी पार्टी रंगली. करणच्या बर्थडे पार्टीत बॉलिवूडचे जवळजवळ सर्व मोठे स्टार्स हजर होते. हृतिक रोशन, कतरिना कैफ, विकी कौशल, करिना कपूर, सैफ अली खान, मनीष मल्होत्रा, सलमान खान असे सर्व करणच्या पार्टीला हजर होते. यावेळी बर्थडे बॉय अर्थातच करण जोहर शिमरी ग्रीन कोटमध्ये डॅशिंग अवतारात दिसून आला. बर्थ डे बॉयने डॅशिंग अंदाजात एन्ट्री घेतली. पण आता करणच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची बॉलिवूडला मोठी किंमत मोजावी लागत असल्याचं म्हटलं जात आहे.
रिपोर्टनुसार, करणच्या वाढदिवसाची पार्टी एक सुपर स्प्रेडर इव्हेंट बनली आहे, ज्यामध्ये 50-55 पाहुण्यांना कोरोनाची लागण झाली आहे. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, करण जोहरच्या पार्टीत सहभागी झालेल्या बॉलिवूड सेलिब्रिटींसह 50-55 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. मात्र बदनामीच्या भीतीने ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती देत नाहीत. एका सूत्राने पोर्टलला सांगितले की, "बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील करणच्या अनेक जवळच्या मित्रांना पार्टीनंतर कोरोनाची लागण झाली आहे."
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेलिब्रिटींनी आपली चाचणी कोरोना पॉझिटिव्ह आल्याचा खुलासा केलेला नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. अभिनेता कार्तिक आर्यनला कोरोनाची लागण झाली आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करून त्याने याबाबत माहिती दिली आहे. कार्तिकला याआधी देखील कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर आता दुसऱ्यांदा त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. कार्तिकने आपल्या हटके अंदाजात याबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे.
"सर्व काही इतकं पॉझिटिव्ह सुरू होतं की कोरोनाला राहावलं नाही"; कार्तिक आर्यनला दुसऱ्यांदा लागण
"सर्व काही इतकं पॉझिटिव्ह सुरू होतं की कोरोनाला राहावलं नाही" असं म्हटलं आहे. तो कोविड पॉझिटिव्ह असल्याच्या बातमीने चाहते निराश झाले आहेत चाहत्यांनी त्याला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीत स्वत:चे स्थान निर्माण करणाऱ्या कार्तिक आर्यनला याआधीही कोरोनाचा फटका बसला आहे. 'भूल भुलैया 2' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान कार्तिकचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. मात्र, काही दिवसांनंतर अभिनेता या गंभीर व्हायरसमधून बरा झाला होता. अशा परिस्थितीत आता परत कार्तिक आर्यन लवकरच कोरोनाची लढाई जिंकून पुनरागमन करेल अशी अपेक्षा आहे.