बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता (lara dutta) हिचा पूर्वीपेक्षा आता कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. मात्र, सोशल मीडियावर तिची कायम चर्चा होत असते. लारा अनेकदा तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चा येते. यामध्येच लाराने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून तिच्या या निर्णयाची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे. आतापर्यंत लारा अनेक जाहिरातींमध्ये झळकली आहे. मात्र, यावेळी तिने सॅनिटरी नॅपकिनची जाहिरात करणार नाही, असा निर्णय घेतला. त्यामुळेच तिने हा निर्णय नेमका का घेतला हा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.
अलिकडेच लाराने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने यापुढे सॅनिटरी नॅपकिनसह अन्य काही जाहिरातींमध्ये काम करणार नसल्याचं जाहीर केलं. ज्या गोष्टी मी वापरत नाही त्यांचा प्रचार किंवा प्रसिद्ध मी करणार नाही, असं तिने ठामपणे सांगितलं.
"मद्यपानाला प्रोत्साहन देणाऱ्या जाहिरातींमध्ये मी काम करत नाही. मला हे करणं योग्य वाटत नाही. मी सिगरेटचा प्रचारही कधीच करत नाही. अलिकडेच मी सॅनिटरी नॅपकिन्सच्या जाहिराती करणंही बंद केलं आहे. ज्या गोष्टी मी वापरत नाही किंवा करत नाही, त्यांचा अनुभव न घेता मी उगाच त्याची प्रसिद्धी करणार नाही", असं लारा म्हणाली.
दरम्यान, गेल्या कित्येक वर्षांपासून लाराचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. २००० मध्ये लाराने मिस युनिव्हर्सचा खिताब जिंकला. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. लाराने 'मस्ती', 'नो एंट्री', 'भागम भाग', 'झूम बराबर झूम', 'पार्टनर', 'चलो दिल्ली', 'डॉन 2' या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.