Arjun Rampal Casting :फराह खान दिग्दर्शित 'ओम शांती ओम' या चित्रपटाची क्रेझ आजही चाहत्यांमध्ये कायम आहे. या चित्रपटात शाहरुख खानसह अभिनेत्री दीपिका पादुकोण, अर्जुन रामपाल तसेच किरण खेर यांसारखी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळाली. पण तुम्हाला माहिती आहे का? 'ओम शांती ओम' मध्ये व्हिलन मुकेश मेहराचं पात्र साकारण्यासाठी बऱ्याच कलाकरांनी नकार दिला होता. या चित्रपटात मुकेश मेहराच्या स्वभावाला साजेसं असं कॅरेक्टर फराह खानला सापडत नव्हतं. त्यासाठी तिला तारेवरची कसरत करावी लागली. अखेरीस अभिनेता अर्जुन रामपालची या भूमिकेसाठी निवड करण्यात आली.
'शेमारो'ला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत फराह खानने चित्रपटाच्या कास्टिंगविषयी एक गमतीदार किस्सा सांगितला आहे.
बाथरुममध्ये ऐकवली स्क्रिप्ट-
फराहने मुलाखतीत सांगितलं, "अर्जुन रामपालला मुकेश मेहराच्या भूमिकेसाठी कास्ट करणं मोठं जिकरीचं काम होतं. सिनेमांच शूटिंग सुरू होण्याकरिता अवघे काही दिवस उरले होते. चित्रपटाच्या शूटिंगला ६ जानेवारीला सुरूवात करायची होती. त्यामुळे हातात वेळही कमी होता. ३१ डिसेंबरच्या रात्री शाहरुखच्या घरी 'न्यू इअर पार्टी'मध्ये मी अर्जुन रामपालला पाहिलं. तेव्हाच शाहरुखच्या बाथरुममध्ये अर्जुन रामपालचं कास्टिंग सेशन झालं. आम्ही त्याला बाथरुममध्ये घेऊन गेलो दरवाजा बंद केला आणि सिनेमाची स्क्रिप्ट वाचून दाखवली. असं करणं आमच्यासाठी फारच गरजेचं होतं. आमच्याकडे काही पर्यायच नव्हता. सुरूवातीला अर्जुनने या भूमिकेसाठी नकार दिला, पण शाहरुखने त्याचं मतपरिवर्तन केलं.
फराहला सिनेमामध्ये अर्जुन रामपालला व्हिलनच्या भूमिकेसाठी तयार करायचं होतं, त्यासाठी तिला शाहरुख खानची मदत घ्यावी लागली होती.अशातच शूटिंगच्या दोन दिवसापूर्वी अर्जुन रामपालने मुकेश मेहरा नावाचं पात्र साकारण्यासाठी होकार दिला. त्यानंतर अभिनेता अर्जुन रामपालची या भूमिकेसाठी निवड करण्यात आली असा मजेशीर किस्सा फराह खानने लाईव्ह मुलाखतीत सांगितला.