नवी दिल्ली: आताच्या घडीला देशभरातील पाच राज्यांतील निवडणुकांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. पैकी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (UP Election 2022) दोन टप्प्यातील मतदान पूर्ण झाले असून, आता उर्वरित टप्प्यातील मतदानाची धूम सुरू आहे. पंतप्रधान मोदींपासून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्यापर्यंत भाजपचे अनेकविध नेते प्रचारात मग्न असल्याचे दिसत आहे. यातच आता बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळख असलेल्या कंगना रणौत (Kangana Ranaut) हिने योगी आदित्यनाथ यांना पाठिंबा दर्शवला आहे.
कंगना रणौतने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली असून, यामध्ये योगी आदित्यनाथ यांच्या कामाचे कौतुक केले आहे. शेअर केलेल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये कंगना म्हणतेय की, गरिबांचे स्वप्न पूर्ण झाले. लाखो लोकांना स्वतःचे घर मिळाले. तुमचे एक मत गरीब आणि गरजू लोकांचे प्राण वाचवू शकते. कारण, योगी जिंकतील, तर यूपी जिंकेल, असे कंगनाने म्हटले आहे.
तिजोरी रिकामी करू, पण घरोघरी कोरोनाची लस पोहोचवू
उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीतापूर येथील प्रचारसभेत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. उत्तर प्रदेशात परिस्थिती अशी होती की, तणावाशिवाय आणि कर्फ्यूशिवाय एखादा सण झाला तर लोक सुटकेचा नि:श्वास घेत होते. आता उत्तर प्रदेशातील जनतेला गुन्हेगार आणि दंगलखोरांपासून मुक्त करण्याचे काम योगी सरकारने केले आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच, जनतेला भाजपाला मत देण्याचे आवाहन करून ते म्हणाले की, ज्यांनी कायद्याचे राज्य आणले त्यांना आम्ही आणले असे संपूर्ण उत्तर प्रदेश सांगत आहे.
दरम्यान, कोरोनाची लस परदेशात चढ्या किमतीत दिली जात आहे, मात्र भारतातील भाजप सरकारसाठी तिजोरी नव्हे तर देशवासियांचा जीव अनमोल आहे. तिजोरी रिकामी करू, पण लस घरोघरी पोहोचविणार. हे काम आम्ही केले आहे. तसेच, गरीब माता, बहिणी आणि मुलींना दुःखापासून, उघड्यावर शौचाच्या अपमानापासून मुक्ती हवी आहे. स्वातंत्र्याच्या सात दशकांनंतर माझी गरीब आई अंधाराची वाट पाहत असे. ही माझ्या गरीब आईची व्यथा, गरीब कुटुंबाची व्यथा, गरिबीतून आलेला तिचा मुलगाच जाणू शकतो, असे नरेंद्र मोदी म्हणाले.