दारुच्या प्रचंड आहारी गेले होते महेश भट्ट; एकेकाळी नशेमध्ये विसरले होते घरचा पत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 07:00 AM2023-03-14T07:00:00+5:302023-03-14T07:00:00+5:30
Mahesh bhatt: महेश भट्ट यांनी अभिनेता अरबाज खानच्या The Invincibles या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी बोलत असताना त्यांनी एकेकाळी दारूच्या प्रचंड आहारी गेलो होतो असं सांगितलं.
दिग्दर्शक, निर्माता असलेले महेश भट्ट (Mahesh Bhatt) कोणासाठीही नवीन नाहीत. महेश भट्ट यांचं जितकं फिल्मी करिअर गाजलं त्यापेक्षा कैकपटीने त्यांची पर्सनल लाइफ चर्चिली गेली. किंबहुना अजूनही त्यांच्या वैयक्तिक जीवनाची नेटकऱ्यांमध्ये चर्चा होते. बऱ्याचदा वादग्रस्त वक्तव्य करुन चर्चेत येणारे महेश भट्ट सध्या त्यांच्या दारुच्या व्यसनामुळे चर्चेत येत आहेत. एकेकाळी ते दारुच्या प्रचंड आहारी गेले होते. याविषयी त्यांनी एका मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे.
काही काळापूर्वी महेश भट्ट यांनी अभिनेता अरबाज खानच्या (Arbaz Khan) The Invincibles या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी बोलत असताना त्यांनी एकेकाळी दारूच्या प्रचंड आहारी गेलो होतो असं सांगितलं. इतकंच नाही तर दारुच्या नशेत असल्यामुळे घरचा पत्ताही विसरलो होतो, असंही ते म्हणाले. "सुरुवातीच्या काळात मला दारुचं प्रचंड व्यसन जडलं होतं. इतकं की मी सतत दारूच्या नशेत असायचो. त्यामुळे मला माझी पत्नी (पूजा भट्टची आई) बाल्कनीमध्ये बंद करुन ठेवायची", असं महेश भट्ट यांनी सांगितलं.
पुढे ते सांगतात, "एकदा तर मी माझ्या घरचा पत्ताच विसरलो होतो. मी सलमान भेटण्यासाठी त्याच्या घरी गेलो होतो. तिथे मी प्रमाणापेक्षा जास्त दारू प्यायलो. त्यामुळे मला अशा अवस्थेमध्ये एकट्याला घरी सोडणं सलमान आणि सलीम या दोघांनाही पटत नव्हतं. त्यामुळे त्यांनी माझ्यासाठी कॅब बूक करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांनी मला माझ्या घरचा पत्ता विचारला. पण, मला पत्ता आठवतच नव्हता. माझी अशी अवस्था पाहून सलमान आणि त्याच्या कुटुंबियांना वाईट वाटलं होतं. पण, हसूदेखील आवरत नव्हतं."
दरम्यान, महेश भट्ट यांची थोरली लेक शाहीन हिच्या जन्मानंतर त्यांनी दारू पिणं बंद केलं. शाहीनचा जन्म झाला त्यावेळी ते हॉस्पिटलमध्ये तिला भेटायला गेले होते. मात्र, शाहीन वारंवार त्यांच्यापासून दूर जायचा प्रयत्न करत होती. त्यावेळी त्यांना जाणीव झाली की दारुच्या तीव्र वासामुळे आपली लेक आपल्या जवळ येत नाही. तेव्हापासून त्यांनी दारू सोडण्याचा निर्णय घेतला.