बॉलिवूडमध्ये आज अनेक कलाकारांची रेलचेल पाहायला मिळते. यात काही जण मोठा स्ट्रगल करुन यशाच्या शिखरावर पोहोचले आहेत. तर, काही जण अजूनही स्ट्रगल करत आहेत. मात्र, यात काही असेही कलाकार आहेत जे प्रसिद्धी आणि यश पाहून भारावून गेले. परिणामी, बदललेला स्वभाव आणि गर्विष्ठपणा यामुळे या कलाकारांना काम मिळेनासं झालं. यामध्येच सध्या अभिनेता, दिग्दर्शक साजिद खान याची चर्चा रंगली आहे. कोरिओग्राफर फराह खान हिचा भाऊ साजिद एकेकाळी लोकप्रिय अभिनेता होता. मात्र, त्याच्या गर्विष्ठ आणि हेकेखोर स्वभावामुळे आज तो एकटा पडला आहे. इतकंच नाही तर त्याला कामासाठीदेखील अनेक दिग्दर्शकांच्या ऑफिसच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत.
साजिद खान हे नाव साऱ्यांच्याच परिचयाचं आहे. उत्तम दिग्दर्शक, अभिनेता म्हणून त्याने एकेकाळी तुफान लोकप्रियता मिळवली. मात्र, आज त्याच्या स्वभावामुळे त्याला काम मिळणं कठीण झालं आहे. इतकंच कशाला तर त्याच्या खासगी आयुष्यावरही त्याचा परिणाम झाला. त्यामुळे आजतागायत तो नेटाने संसार थाटू शकलेला नाही.
‘मैं हूं डिटेक्टिव’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून साजिदने त्याच्या करिअरला सुरुवात केली. या कार्यक्रमात तो सूत्रसंचालकाच्या भूमिकेत होता. त्यानंतर २००६ मध्ये त्याने दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण केलं. 'डरना भी जरूरी है’ हा त्याचा दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा. या सिनेमानंतर त्याने अनेक हिट सिनेमा बॉलिवूडला दिले. लागोपाठ सिनेमा हिट ठरत असल्यामुळे या यशाची हवा त्याच्या डोक्यात गेली आणि तिथेच सगळं गणित फिसकटलं. त्याचं वागणं बदलल्यामुळे त्याच्यासोबत काम करायला कोणी तयार होईना.
#Metoo च्या आरोपांमुळे झालं करिअर उद्धवस्त
साजिद आणि अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस एकेकाळी एकमेकांना डेट करत होते. परंतु, २०१३ मध्ये त्यांचं ब्रेकअप झालं. त्यानंतर २०१८ मध्ये अनेक अभिनेत्रींनी त्याच्यावर #Metooचे आरोप केले. या आरोपांचा त्याच्या करिअरवर चांगलाच परिणाम झाला. या आरोपांमुळे त्याला हाऊसफूल 4 मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्याच्या जागी फरहाद सामजी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं. त्यानंतर तो बिग बॉस १६ मध्ये सहभागी झाला. मात्र, तेथे गेल्यानंतर शर्लिन चोप्रा याने पुन्हा त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.