2015 हे वर्ष बॉलीवूडसाठी ऐतिहासिक, रोमॅण्टिक आणि अॅक्शनने भरपूर असलेल्या चित्रपटांमुळे गाजले. 2016 या नवीन वर्षात बॉलीवूड जणू स्पोर्ट्समय होणार आहे. या वर्षात प्रेक्षकांना मनोरंजनाबरोबरच अनेक वास्तव कथाही पडद्यावर पाहता येणार आहेत. याची सुरुवात शुकव्रारी प्रदर्शित झालेल्या ‘साला खडूस’ या चित्रपटाने झाली आहे. साला खडूस या चित्रपटात माधवनने बॉक्सर कोचची जबरदस्त भूमिका निभावली आहे. यासाठी त्याने त्याच्या लूकवर विशेष मेहनत घेतली असून, तो बलदंड शरीरासह प्रेक्षकांसमोर आला आहे. यात बॉक्सिंग या खेळाला फोकस करण्यात आले आहे. या चित्रपटात नवोदित अभिनेत्री आणि बॉक्सर रितिका सिंह माधवन याची शिष्या बनली आहे. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन सुधा कोंगरा यांनी केले आहे. दंगलदंगल हा चित्रपट देखील खेळाशी संबंधित आहे. यात कुश्तीची दंगल चित्रित करण्यात आली आहे. ‘दंगल’मध्ये आमीर खान पहिलवानाच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. सध्या तो या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून, महावीर सिंग फोगट यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. महावीर सिंग फोगट यांनी त्यांच्या मुली बबिता कुमारी आणि गीता फोगट यांना पहिलवानीचे धडे दिले आहेत. सुलतानयशराज बॅनरच्या आणि अली अब्बास जफर यांनी दिग्दर्शित केलेल्या सुलतान या चित्रपटात सलमानने एका पहिलवानाची भूमिका साकारली आहे. यातही कुश्तीचे दृश्य प्रेक्षकांना रिझवणार आहेत. या चित्रपटातील सलमान खानच्या लूकची त्याच्या चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा आहे. अजहर चित्रपट आणि क्रिकेटची आवड असलेल्या प्रेक्षकांसाठी हा चित्रपट म्हणजे मेजवानीच आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन याच्या जीवनावर आधारित ‘अजहर’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. यामध्ये इमरान हाशमी याने अझरुद्दीनची भूमिका साकारली आहे. अझहरचे दिग्दर्शन टोनी डिसूजा यांनी केले असून, मे महिन्यात हा चित्रपट रिलिज होणार आहे. धोनी : द अनटोल्ड स्टोरीभारताचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार असलेल्या महेंद्रसिंग धोनी याच्याही जीवनावर आधारित ‘धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये सुशांत सिंह राजपूत याने धोनीची भूमिका साकारली आहे. त्याचबरोबर स्टार बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल हिच्या जीवनावर आधारित चित्रपटदेखील याच वर्षी रिलिज होण्याची शक्यता आहे. दिग्दर्शक अमोल गुप्ते यांनी याबाबतची यापूर्वीच घोषणा केली आहे.
बॉलीवूड होणार स्पोर्ट्समय
By admin | Published: February 01, 2016 1:55 AM