सध्याच्या काळात कलाविश्वात अनेक स्टार किड्सची रेलचेल असल्याचं पाहायला मिळतं. यातील काही स्टारकिड लोकप्रिय झाले तर काहींना फारसं यश मिळालं नाही. यातलाच एक स्टार किड म्हणजे अध्ययन सुमन (adhyayan suman). अभिनेता शेखर सुमन (shekhar suman) याचा लेक अध्ययन यानेही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेव कलाविश्वात पदार्पण केलं. परंतु, सुरुवातीच्या काळात त्याचे असंख्य सिनेमे फ्लॉप झाले. परिणामी, त्याने एकेकाळी आत्महत्येचाही विचार केला होता. एखा मुलाखतीत त्याने याविषयी भाष्य केलं.
अलिकडेच अध्ययनने त्याच्या मानसिक आजाराविषयी भाष्य केलं. त्याला कसा मानसिक त्रास झाला आणि त्यातून तो कसा बाहेर पडला हे त्याने सांगितलं. मध्यंतरी नवाजुद्दीन सिद्दिकीन त्याच्या मानसिक समस्येविषयी भाष्य केलं. त्यावरुन अध्ययनने त्याच्या आजाराविषयी सांगितलं.
"मी खूप काळ अशा अवस्थेत होतो. पण, यातून बाहेर पडलो यासाठी देवाचे आभार मानतो. माझ्या कुटुंबामुळे आणि मित्रांमुळे मी आज जिवंत आहे. एक वेळ अशी आली होती की, मी आयुष्य संपवायचा विचार करत होतो. आता त्याविषयी बोलायलाही नको वाटतं. मी तासंतास बेडवर पडून असायचो आणि सतत पंख्याकडे पाहायचो. असं वाटायचं माझ्या जगण्याला काहीच अर्थ नाहीये. सगळं संपलंय. हे सगळं माझ्यासोबतच का घडतंय हा प्रश्न पडायचा", असं अध्ययन म्हणाला.
पुढे तो म्हणतो, "पण या सगळ्यातून मला माझ्या कुटुंबियांची आणि मित्रपरिवाराची मदत झाली. या काळात माझे मित्र रोज माझ्या घरी यायचे. माझं बोलणं ऐकून घ्यायचे. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी माणसं असायला हवीत. सुरुवातीला माझे काही सिनेमे हिट झाले. त्यामुळे करिअरची सुरुवात छान झाली. पण, २०१० मध्ये माझे १२ सिनेमे फ्लॉप झाले. मी अनेक ऑफर्स नाकारल्या. काही चुकाही केल्या. आता त्या चुका करायच्या नाहीत."