'12th Fail' या सिनेमामुळे दिग्दर्शक विधु विनोद चोप्रा चर्चेत आले. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ तर घातलाच पण प्रेक्षकांच्या मनातही स्थान निर्माण केलं. आता विधु चोप्रा चर्चेत आले आहेत ते त्यांच्या लेकामुळे. विधु चोप्रा यांचा लेक अग्नी चोप्रा सध्या क्रिकेटचं मैदान गाजवत आहे. रणजी ट्रॉफीतून क्रिकेटविश्वात पदार्पण केलेला अग्नी चोप्रा दमदार कामगिरी करत आहे. सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांनाही जे जमलं नाही ते अग्नी चोप्राने करून दाखवलं आहे.
रणजी ट्रॉफीत मिझोराम टीमकडून खेळणाऱ्या अग्नी चोप्राने पहिल्याच मॅचमध्ये शतक ठोकलं होतं. सिक्कीम विरुद्धच्या सामन्यात अग्नी चोप्राने १७९ चेंडूमध्ये १६६ धावा केल्या होत्या. त्यानंतर अग्नी चोप्राने लागोपाठ चार सेंच्युरी केल्या आहेत. फर्स्ट क्लास क्रिकेटच्या इतिहासात लागोपाठ ४ शतक ठोकणारा २५ वर्षीय अग्नी चोप्रा पहिलाच आहे. त्याच्या या दमदार कामगिरीमुळे मिझोराम टीम ४ पैकी २ सामन्यात विजय मिळवला आहे.
पहिल्याच सामन्यात १६६ धावा केल्यानंतर अग्नीने नागालँडविरुद्धच्या सामन्यातही शतक ठोकलं. त्यानंतर अरुणाचल प्रदेशबरोबर झालेल्या तिसऱ्या सामन्यात त्याने ११४ धावांची खेळी केली. मेघायल विरुद्धच्या सामन्यात पुन्हा सेंच्युरी करत अग्नीने इतिहास रचला आहे.
अग्नीने रणजी ट्रॉफीमधून क्रिकेटविश्वात पदार्पण करण्याआधी अ गटातील ७ आणि अनेक टी-२० सामने खेळले आहेत. अग्नीने युनायटेड स्टेट्समधून क्रिकेटची सुरुवात केली होती. त्यानंतर मुंबईत येऊन त्याने ज्युनियर क्रिकेट टीममध्ये खेळायला सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने मिझोराममधून क्रिकेट खेळायला सुरुवात केली. ऑक्टोबर २०२३मध्ये अग्नीने सय्यद मुशतक अली ट्रॉफीमधून नॉर्थ इंस्टर्न स्टेटमध्ये पदार्पण केलं होतं.